छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या ६ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी जिजाऊ चौक येथे सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. या वेळी वाहनाच्या २ कि.मी. लांब रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या रांगा वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना कह्यात घेत ‘रस्ता बंद’ आंदोलन थांबवले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील एका वर्षापासून प्रयत्नरत आहेत. ‘मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, सगे-सोयरे कायदा पारित करा’, अशा मागण्यांसाठी जरांगे आग्रही आहेत. जरांगे यांनी राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत दिली होती; परंतु सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाकडून ‘परभणी बंद’ची हाक देण्यात आली आहे. यासमवेत पुणे येथेही बंदची हाक देण्यात आली आहे.