१०७ वर्षांपूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मूर्ती सापडली !
सुपे (पुणे) – पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे. टोळीकडून १०७ वर्षांपूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मूर्ती, देवीचा मुखवटा, १५ घंटा, मुकुट, समई, पंचारती, मंदिरातील अन्य धातूच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या टोळीकडून केलेल्या आणखी चोर्या उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सुपे (ता. बारामती) येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्तीवर असतांना ही टोळी सापडली. वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी आणि अन्य ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची स्वीकृती या चोरांनी दिल्याने या प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे बिरादार यांनी सांगितले.