आदर्श वास्तववादी हवेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

मध्यंतरी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. एक वडील त्यांच्या ३-४ वर्षांच्या मुलाला खेळवत होते. मुलाने ‘स्पायडरमॅन’सारखी वेशभूषा केली होती. वडील त्याला घरातील भिंतींवरून ‘स्पायडरमॅन’प्रमाणे चालवत होते. ‘स्पायडरमॅन’ जसा आडवा-तिडवा, वेडावाकडा कसाही उड्या मारत जातो, तसे ते त्याला धरून सर्वत्र फिरवत होते. तसे करतांना त्या मुलालाही गंमत वाटत होती. मनोरंजन किंवा खेळ म्हणून हे सर्व ठीक आहे; पण जे वडिलांनी केले, त्याचे अनुकरण मुलांनी आणखी मोठे झाल्यावर केले, ‘स्पायडरमॅन’प्रमाणे कुणाचाही आधार न घेता भिंतींवरून चालण्याचा किंवा उड्या मारण्याचा प्रयत्न (स्टंट) केला किंवा त्याहीपेक्षा आणखी काही विध्वंसक प्रकार केला, तर त्याला उत्तरदायी कोण ? असे व्हिडिओ पाहून अन्य लहान मुलांनीही त्यांच्या पालकांकडे असे कपडे घालण्याचा किंवा अशा प्रकारे भिंतीवरून चालवण्यासाठी हट्ट केला, तर तो कोण आणि कसा पुरवणार ?

सध्याचे जग ‘रिल्स’चे (छोट्या ध्वनीचित्रफितींचे) आहे. त्यांचेच अनुकरण करण्याचा मुले प्रयत्न करतात; पण या मुलांना योग्य दिशा देणे, त्यांच्यासमोर योग्य आदर्श उभे करणे हे पालकांचे दायित्व आहे. स्पायडरमॅन किंवा एखादे ‘कार्टून’ असो, त्यांचा भविष्यात या मुलांना काय लाभ होणार आहे ? त्यापेक्षा या मुलांसमोर संत, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचे आदर्श ठेवायला हवेत. ज्यांनी राष्ट्र-धर्मासाठी कार्य केले, आध्यात्मिक वारसा टिकवून ठेवण्यात आयुष्य खर्ची केले, भावी पिढीला सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावले, त्यांची उदाहरणे देऊन मुलांना घडवायला हवे.

आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीविषयी मुलांना का नाही सांगत ? काजव्यांच्या प्रकाशात अभ्यास करून शिक्षण घेणारे गोपाळकृष्ण गोखले यांचे व्यक्तीमत्त्व साकारणारा मुलांचा व्हिडिओ का नाही चित्रीत केला जात ? मुलांना भिंतीवरून चालवण्यापेक्षा आध्यात्मिक सामर्थ्यावर भिंत चालवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्याविषयीचे अमूल्य ज्ञान का नाही देऊ शकत ? झाशीची राणी लक्ष्मीबाईने बाळाला समवेत घेऊन, नऊवारी नेसून घोडेस्वारी केली, तर तिचा आदर्श देण्यासाठी आपल्या लेकीबाळींचे त्या वेशभूषेत का नाही व्हिडिओ काढून प्रसारित करत ? आज प्रत्येक मुलीला चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसारखे सुंदर दिसायचे असते; पण ‘मला रणरागिणी व्हायचे आहे’, असे म्हणणारी मुलगी शोधावी लागेल. ज्या व्यक्तीरेखा मुलांचे आयुष्य घडवतील, त्यांची माहिती द्यायला हवी. भारतीय संस्कृतीने दिलेला अमूल्य आणि समृद्ध वारसा आपण, पर्यायाने भावी पिढीनेही पुढे चालवायचा आहे. यासाठी त्यांचे पाऊल ‘कार्टून’प्रमाणे उड्या मारणारे नव्हे, तर महनीय व्यक्तींप्रमाणे रूबाबदार आणि तितकेच दायित्वाने पडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे पालकांनी जाणावे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.