Raj Thackeray Warns Mumbai Theaters : कुठल्‍याही परिस्‍थितीत पाकिस्‍तानी अभिनेत्‍याचा चित्रपट महाराष्‍ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे

मुंबई – फवाद खान नावाच्‍या पाकिस्‍तानी अभिनेत्‍याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना हा चित्रपट कुठल्‍याही परिस्‍थितीत महाराष्‍ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे.

याविषयी राज ठाकरे यांनी ‘एक्‍स’ खात्‍यावरून प्रसारित केलेल्‍या संदेशात म्‍हटले आहे की, पाकिस्‍तानी कलाकारांचे चित्रपट मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात ? कलेला देशांच्‍या सीमा नसतात, हे सगळे अन्‍य गोष्‍टींच्‍या संदर्भात ठीक आहे; पण पाकिस्‍तानच्‍या संदर्भात हे मुळीच चालू देणार नाही. ‘भारताचा द्वेष’ या एकमेव सूत्रावर जो देश तग धरून आहे, त्‍या देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्‍यांचे चित्रपट  प्रदर्शित करू देणे हा काय प्रकार चालू आहे ? महाराष्‍ट्र सोडाच; पण देशातील कुठल्‍याच राज्‍यात हा चित्रपट तेथील सरकारांनी प्रदर्शित होऊ देऊ नये. अर्थात् अन्‍य राज्‍यांनी काय करायचे ?, हा त्‍यांचा प्रश्‍न आहे. महाराष्‍ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, हे मात्र निश्‍चित ! कुठल्‍यातरी पाकिस्‍तानी चित्रपटासाठी राज्‍यात संघर्ष होऊ नये, अशीच माझी इच्‍छा आहे आणि सरकार त्‍याकडे योग्‍य ते लक्ष देईल, याची मला निश्‍चिती आहे.


उगाच चित्रपट प्रदर्शित करण्‍याच्‍या भानगडीत पडू नका !

‘या आधी असे प्रसंग जेव्‍हा आले होते, तेव्‍हा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्‍यांना आठवत असेल. त्‍यामुळे चित्रपटगृहाच्‍या मालकांना सध्‍या तरी नम्रपणे आवाहन आहे की, उगाच चित्रपट प्रदर्शित करण्‍याच्‍या भानगडीत पडू नका. या चित्रपटाच्‍या प्रदर्शनाच्‍या कालावधीत नवरात्रोत्‍सव चालू होणार आहे. अशा वेळी ‘कुठलाही संघर्ष महाराष्‍ट्रात व्‍हावा’, अशी माझी इच्‍छा नाही आणि मुख्‍यमंत्री, गृहमंत्री अन् राज्‍याचे पोलीस महासंचालक यांचीही तशी इच्‍छा नसणार. उगाच संघर्ष आम्‍हालाही नको. त्‍यामुळे वेळीच पाऊल उचलून हा चित्रपट आपल्‍याकडे प्रदर्शित होणार नाही, हे पहावे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्‍ध करून देतांना मागेपुढे करणार्‍या चित्रपट मालकांनी जर पाकिस्‍तानी चित्रपटाला या भूमीत पायघड्या घातल्‍या, तर हे औदार्य महागात पडेल, हे विसरू नये’, असेही राज ठाकरे यांनी म्‍हटले आहे.