‘नारायणबळी विधी’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘एका ज्योतिषाने पितृदोषाचे निवारण होण्यासाठी मला ‘नारायणबळी विधी’ करण्यास सांगितला होता. हा विधी १.५.२०२४ या दिवशी हरवळे (गोवा) येथे करण्यात आला. या विधीचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. या विधीत मी भाताच्या पिंडावर स्वतःच्या उजव्या अंगठ्याने पितरांना पाणी देण्याची कृती केली. तेव्हा मला जाणवले, ‘ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला पाणी मिळाल्यास ती तृप्त होते, त्याप्रमाणे पितरांना पाण्याद्वारे आध्यात्मिक ऊर्जा मिळून ते तृप्त होत आहेत.’

२. हा विधी पूर्वजांना गती मिळण्यासाठी केला जातो. हा विधी चालू असतांना मला जाणवले, ‘बसस्थानकावर बसगाड्या येण्यापूर्वी शांतता असते. गाडी आली की, काही प्रवासी लगबगीने बसमध्ये चढतात. काही प्रवासी त्या गाडीत न बसता योग्य त्या गाडीची वाट पहातात, तर काही प्रवासी तटस्थ उभे असतात, त्याप्रमाणे विधी चालू असतांना सूक्ष्म लोकात पितरांची स्थिती होती. विधी चालू झाल्यावर ज्या पितरांना पुढील गती हवी आहे, ते उत्कंठतेने वाट पहात विधीतील आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करत होते. काही पितरांच्या आणखी काही इच्छा शेष होत्या आणि त्यांना पुढील गती नको होती. असे पितर विधीद्वारे  केवळ आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करत होते आणि काही पूर्वज या विधीकडे तटस्थ राहून पहात होते.’

३. विधीच्या शेवटी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘माझ्या एकूण पितरांपैकी ६ पितरांना नारायणबळी विधीतून पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळाली आणि त्यांना पुढील गती प्राप्त झाली. ज्याप्रमाणे रॉकेट आकाशाच्या दिशेने झेपावण्यापूर्वी कंप पावते आणि त्यानंतर ते वेगाने वरच्या दिशेने प्रवास करते, त्याप्रमाणे विधीतून पितरांना पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाल्याने त्यांच्या शक्तीत वाढ झाली अन् त्यानंतर ते वेगाने पुढील प्रवासासाठी निघून गेले. काही पूर्वज काही ना काही कारणास्तव अडकलेले दिसले. या विधीतून त्यांना पुढील गती न मिळता केवळ आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली.’

४. विधीतून माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्यानंतर माझ्या शरिराला हलकेपणा जाणवू लागला.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक