जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

‘११.६.२०२४ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये एका अनौपचारिक कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जगप्रसिद्ध प्रवचनकार, भारतभूषण आणि भारताचार्य प्रा. सुरेश गजानन शेवडे यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या कार्यक्रमाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांची वंदनीय उपस्थिती होती. देवाच्या कृपेने या संतसोहळ्याचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लिखाणबद्ध केले आहे. हा लेख पू. शेवडे गुरुजींच्या पावन चरणी सविनय अर्पण करत आहे.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

१. संतपद घोषित करण्यापूर्वी

सुश्री (कु.) मधुरा भोसले

वातावरणात थोडा दाब असल्यामुळे मनाला अस्वस्थता जाणवत होती. त्याचप्रमाणे मला वातावरणात त्रासदायक शक्तीचे काळे भोवरे फिरतांना जाणवले. त्यामुळे मला काही सुचत नव्हते.

२. कार्यक्रमस्थळी पू. शेवडेगुरुजी, डॉ. (सौ.) कुंदा आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शुभागमन झाल्यावर वातावरणात आमूलाग्र पालट होणे

जेव्हा कार्यक्रमस्थळी पू. शेवडेगुरुजी, डॉ. (सौ.) कुंदा आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शुभागमन झाले, तेव्हा डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्याकडून सकारात्मक शक्ती, पू. शेवडेगुरुजी यांच्याकडून भाव आणि चैतन्य अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून आनंद अन् शांती यांच्या सूक्ष्मतम लहरी वायुमंडलात पसरल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळाची चैतन्याच्या स्तरावर शुद्धी होऊन तेथील वातावरण सकारात्मक, उत्साहवर्धक आणि आनंदमय झाले.

३. पू. शेवडेगुरुजी धर्मावर प्रवचन करत असतांना त्यांच्या वाणीतून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज प्रगट होणे

पू. शेवडेगुरुजी यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची पुष्कळ कृपा असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्यावर श्री सरस्वतीदेवीकडून चैतन्यदायी कृपेचा ओघ येऊन तो त्यांच्या सहस्रारचक्रातून त्यांच्या बुद्धीत कार्यरत झाला. हा चैतन्यदायी प्रवाह त्यांच्या वाणीतून प्रगट होत होता. त्यामुळे त्यांची वाणी ओजस्वी आणि ब्राह्मतेजाने ओतप्रोत असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे त्यांच्या हृदयात श्री गुरूंप्रती दास्यभक्ती असल्यामुळे दास्यभक्तीचे मूर्तीमंत स्वरूप असणार्‍या हनुमानाची कृपा त्यांच्यावर झाली. त्यामुळे त्यांच्या हृदयात निर्माण झालेला क्षात्रतेजाचा प्रवाह त्यांच्या वाणीद्वारे कार्यरत झाला. त्या वेळी त्यांनी मनुस्मृति जाळणार्‍या धर्मद्रोह्यांचे कठोर शब्दांत आणि क्षात्रवृत्तीने खंडण केले. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या साधकांचाही धर्माभिमान जागृत होण्यास साहाय्य झाले. यावरून ‘संतांच्या वाणीतून समष्टीच्या आवश्यकतेनुसार क्षात्रतेज किंवा ब्राह्मतेज प्रगट होत असते’, असे शिकायला मिळाले.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. शेवडेगुरुजींना ‘संत’ म्हणून घोषित करणे

जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. शेवडेगुरुजींचे संतपद घोषित केले, तेव्हा कार्यक्रमस्थळी पू. शेवडेगुरुजींचे आध्यात्मिक गुरु शेगावचे सुप्रसिद्ध संत प.पू. गजानन महाराज आणि इंदूरचे प.पू. नाना महाराज तराणेकर हे सूक्ष्मातून उपस्थित होते. या दोन्ही गुरूंनी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या माध्यमातून त्यांचे परमप्रिय शिष्य पू. शेवडेगुरुजींचा सन्मान केल्याचे जाणवले. त्यांच्या सूक्ष्मातील वंदनीय उपस्थितीत पू. शेवडेगुरुजींचा संतसोहळा पार पडला. तेव्हा वातावरणात गुलाब आणि चंदन यांचा दैवी सुगंध दरवळत होता.

५. पू. शेवडेगुरुजी मनोगत व्यक्त करत असतांना घडलेली सूक्ष्म प्रक्रिया

पू. शेवडेगुरुजी मनोगत व्यक्त करत असतांना त्यांच्या वाणीतील ब्राह्मतेजामुळे उपस्थितांना चैतन्यासह धर्माचे ज्ञान मिळत होते आणि क्षात्रतेजामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आलेल्या वाईट शक्ती दूर पळून गेल्या. अशा प्रकारे पू. शेवडेगुरुजींच्या उपस्थितीत सर्वांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांचे त्रास दूर झाल्याचे जाणवले.

६. पू. शेवडेगुरुजींची दास्यभक्ती आणि कीर्तनभक्ती यांच्यामुळे त्यांच्यावर गुरुतत्त्वासह ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही प्रसन्न असणे

पू. शेवडेगुरुजी यांची व्यष्टी स्तरावर दास्यभक्ती आणि समष्टी स्तरावर कीर्तनभक्ती आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुरुतत्त्वासह ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही प्रसन्न आहेत. या त्रिदेवांचे एकत्रित रूप असलेल्या दत्तगुरूंची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. त्यामुळे त्यांना शेगावचे सुप्रसिद्ध संत प.पू. गजानन महाराज आणि इंदूरचे प.पू. नाना महाराज तराणेकर या दोन्ही थोर गुरूंचे शिष्यत्व प्राप्त झाले आहे. पू. शेवडेगुरुजी हे शिष्यत्वाचे उत्तम उदाहरण आहेत.

७. पू. शेवडेगुरुजींच्या माध्यमातून परिणामकारक धर्मप्रसार होण्यामागील रहस्य

पू. शेवडेगुरुजींना वेदमाता श्री सरस्वतीदेवीने अनेक वर्षांपूर्वीच वेद आणि उपनिषदे यांचे ज्ञान दिलेले आहे. या ज्ञानाचा प्रसार त्यांची वाणी आणि लिखाण यांद्वारे होत आहे. त्यांच्यावरील श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळे त्यांच्या ज्ञानाचा प्रसार श्री वाक्देवी (श्री सरस्वतीदेवीचे एक नाव) त्यांच्या वाणीतून, म्हणजे प्रवचनातून करत आहे, तर श्री गणेश त्यांच्या बुद्धीला सात्त्विक करून त्यांच्या लिखाणातून धर्मप्रसार करत आहे.

८. पू. शेवडेगुरुजींच्या संतसोहळ्याला सूक्ष्मातून अनेक देवता उपस्थित असल्याचे जाणवणे

पू. शेवडेगुरुजींनी आयुष्यभर देश-विदेशात केलेल्या धर्मप्रसाराच्या समष्टी सेवेमुळे त्यांना श्री दत्तगुरूंसह त्रिदेव आणि त्रिदेवी यांची भरभरून कृपा लाभली आहे. त्यामुळे त्यांना जीवनात कोणतीच कमतरता भासली नाही. श्री दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींची संतसोहळ्याला सूक्ष्मातून उपस्थिती लाभली. पू. शेवडेगुरुजींचे संतपद घोषित झाल्यावर वेदमाता श्री सरस्वतीदेवीने पू. शेवडेगुरुजींना सोन्याचा मुकुट चढवला. त्यानंतर श्री महालक्ष्मीदेवीने त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि श्री पार्वतीमातेने सोन्याच्या तबकात ठेवलेल्या निरांजनाने त्यांना ओवाळले. तेव्हा स्वर्गलोकातील देवतांनी शंखनाद केला. देवगुरु बृहस्पतींनी वेदांतील मंगल मंत्र म्हटले आणि यक्ष, गंधर्व अन् किन्नर यांनी पू. शेवडेगुरुजींवर पुष्पवृष्टी केली.

९. पू. शेवडेगुरुजींच्या चरणी कृतज्ञताभावाने वाहते ही काव्यसुमनांजली !

जेथे दिव्यत्वाची येते प्रचीती।
तेथे कर माझे जुळती।।

पाहूनी पू. शेवडेगुरुजींची मंगलमूर्ती।
संतत्वाची येते दिव्यानुभूती।।’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक