सांगली, मिरज आणि कुपवाड येथे मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर यांचा वापर !

सांगली, १७ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत गणेशोत्सव मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर न करता डॉल्बीसारख्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजात ध्वनीप्रदूषण करत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काही मंडळांनी डोळ्यांना इजा पोचवू शकणार्‍या लेझरचा वापर केला होता. पोलिसांनी दणदणाटमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, अशा केलेल्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात ध्वनीप्रदूषण करत मिरवणुका काढल्या आहेत. त्यामुळे अशा मंडळांवर पोलीस कारवाई करण्याच्या सिद्धतेत लागले आहेत.

‘यंदांचा गणेशोत्सव दणदणाटमुक्त, शिस्तीत, उत्साहात आणि सामाजिक उपक्रम राबवून मंडळांनी साजरा करावा’, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते.