हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या ‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी अधिवक्ते यांच्याकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !

मंगळुरू (कर्नाटक) – ‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. सायबर क्राईम विभागाने याची तात्काळ नोंद घेऊन फेसबुक खात्याच्या प्रमुखाला (‘ॲडमिन’ला) अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. विजयकुमार यांनी केली आहे. यासंबंधी मंगळुरू सायबर क्राईम विभागात समितीचे समन्वयक, धर्मप्रेमी अधिवक्त्यांची संघटना आणि धर्मप्रेमी यांनी एकत्रित तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजवर भगवान श्रीकृष्णाला अर्धनग्न महिलेसह पळतांना दाखवतांना
भगवान श्रीकृष्णाचे दाखवण्यात आलेले चित्र हे केवळ माहितीसाठी असून यातून धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. – संपादक

१. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजवर प्रतिदिन ७ – ८ वेळा हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेले शिव, कृष्ण, श्रीराम, गणेश या देवतांना महिलांशी अश्लील वर्तन करतांना, पळतांना, कुस्ती खेळतांना अशा विविध प्रकारे दाखवले जात आहे.

२. या छायाचित्रांच्या लिखाणावर अनेक धर्मांध व्यक्ती धार्मिक भावना दुखावणार्‍या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. यामध्ये हिंदूंना भडकावण्याचे एक मोठे षड्यंत्र आहे.

३. पोलिसांना दिलेल्या या तक्रारीत अधिवक्ता तीर्थेश यांनी ‘फॅक्ट व्हिड’ फेसबुक पेजच्या ‘ॲडमिन’वर आणि प्रतिक्रिया देणार्‍यांवर भारतीय दंड संहिता २९९, १९२, ३५३ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच धार्मिक भावना दुखावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ‘एआय’वर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य पावले उचलावीत’, असे म्हटले आहे.

४. पोलीस निरीक्षक भारती यांनी तक्रार स्वीकृत करून ‘समाजाची काळजी घेत तुम्ही उत्तरदायित्वाने विरोध करत आहात. आम्ही तात्काळ कारवाई करू’, असे आश्वासन दिले.

५. या वेळी धर्माभिमानी अधिवक्ता ईश्वर कोत्तारी, श्री. यतिश, सुषमा, उद्योजक श्री. दिनेश एम्.पी., सर्वश्री चंद्रकांत कामत, प्रशांत कांचन, विजय कुमार, बालगंगाधर, नारायण अमीन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजयकुमार उपस्थित होते.