नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांचे प्रकरण
पाटलीपुत्र (बिहार) – २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पाटलीपुत्र येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या ४ आतंकवाद्यांना येथील दिवाणी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने जन्मठेपेत पालटली आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर २ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ४ आतंकवाद्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले, तर २ जणांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला आहे.
१. नुमान अन्सारी, महंमद मजीबुल्ला, हैदर अली, इम्तियाज आलम यांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, जी आता उच्च न्यायालयाने जन्मठेपेत रूपांतरित केली आहे.
२. उमैर सिद्दीकी आणि अझरुद्दीन कुरेशी यांच्या जन्मठेपेचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
३. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे बचाव पक्षाचे अधिवक्ता इम्रान गनी यांनी सांगितले.