शेळगाव (ता. इंदापूर) येथे मध्ययुगीन कालखंडातील श्री गणेशमूर्ती दुर्लक्षित !

अन्य अनेक मूर्ती उघड्यावर

इंदापूर (जिल्हा पुणे) – इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील ओढ्यालगत अनेक दशकांपासून मध्ययुगीन कालखंडातील श्री गणेशमूर्ती उघड्यांवर (दुर्लक्षित) आहेत. (पुरातत्व विभाग याविषयी काही करणार आहे का ? – संपादक) या ठिकाणी पुरातनकालीन देवतांच्या मूर्तींमुळे इतिहासाच्या पाऊलखुणा आपले अस्तित्व टिकवून आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. अत्यंत दुर्मिळ  स्वरूपातील श्री गणेशमूर्ती पहावयास मिळते, अशी माहिती इतिहास अभ्यासक श्री. अनिल दुधाने यांनी दिली.

श्री. दुधाने पुढे म्हणाले, ‘‘शेळगाव येथील श्री गणेशमूर्ती ‘ललिता आसना’मध्ये विराजमान असून ती चतुर्भुज आहे. या श्री गणेशमूर्तीच्या हातांमध्ये दंत, परशू, पाश आणि मोदक आढळते. श्री गणेशमूर्तीच्या उजव्या हातात दंत असून वरील हातांमध्ये पाश आहे. डाव्या हातात पुष्प असून खालील हातात मोदक भरलेले पात्र आहे. वस्त्रांमध्ये कटिवस्त्रामधील पट्टी किंवा काष्ट्याचा समोरील भाग दिसतो. श्री गणेशमूर्ती अनेक आभूषणांनी सजलेली आहे.’’

श्री गणेशमूर्ती ही भग्न झालेल्या श्री शिव मंदिरांमध्ये आढळली आहे. या ठिकाणी श्री गणेशमूर्ती सोबत केशव रूपातील श्री विष्णुमूर्ती आहे. या श्री विष्णुमूर्तीची झीज झाली आहे. या ठिकाणी शिवपिंड, बलीदान निदर्शक वीरगळ अशा अनेक छोट्या-मोठ्या शिल्पकृती आहेत.