बीड येथील श्री गणेश मंदिरांची वैशिष्ट्ये !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त विशेष…

वरेण्युपुत्र गणपति, राजूर

जालना जंक्शनपासून राजूरपर्यंतचे अंतर २७ कि.मी. इतके आहे. हे मंदिर गावाजवळील टेकडीवर आहे. तेथे विठ्ठल-रखुमाई आणि महादेव या देवतांचीही मंदिरे आहेत. देवासमोर समया सतत तेवत असतात. त्या मंद प्रकाशात श्री गणेशाचे दर्शन घडते. या मंदिरात किरीटधारी, अरुंद भाल असलेला गणपति आहे. ही मूर्ती प्राचीन असून स्वयंभू आहे. गणपतीच्या साडेतीन पिठांपैकी राजूर हे पूर्णपीठ मानले जाते. वरणेश्वर नामक राजाचा येथे वाडा होता. त्यामुळे या भागाला ‘राजापुरी’ म्हणत. कालांतराने राजापुरीचे ‘राजूर’ असे नामकरण झाले. वरणेश्वर राजा निःसंतान होता. त्याने येथे तप केले अन् राणीच्या उदरी साक्षात् गणपतीने जन्म घेतला; मात्र त्या मुलाचे रूप विचित्र होते. त्यामुळे राजाने त्या मुलाचा त्याग केला. ऋषिमुनींनी त्या मुलाचे पालनपोषण केले. तोच हा राजूरचा वरेण्यपुत्र गणपति. त्या मूर्तीसमोरच वरेण्यराजाचीही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

श्री गणेश, नामलगाव

हे गणेशस्थान बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे येते. बीडपासून १६ कि.मी. अंतरावर हे गाव असून तेथील वातावरण निसर्गरम्य, पवित्र आणि मनःशांती देणारे आहे. कर्पूरा, बिंदुसूरा आणि नारद या नद्यांच्या संगमस्थानी काठावर हे गणेशमंदिर आहे. या स्थानाविषयीची पौराणिक कथा पुढीलप्रमाणे आहे.

सावत्रमातेच्या शापामुळे सूर्यपुत्र यम मोठ्या संकटात सापडला. तेव्हा सूर्याच्या आदेशानुसार त्याने वनात जाऊन श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाची यमावर कृपा होऊन तो शापमुक्त झाला. त्या वेळी त्याने गणेशमूर्तीची स्थापना केली. ती मूर्ती ‘आशापूरक’ या नावाने प्रख्यात आहे. ज्या तीर्थाच्या स्नानामुळे यम व्याधीमुक्त झाला, ते तीर्थकुंड ‘सुबुद्धिप्रद गणेशतीर्थ’ या नावाने ओळखले जाते. नामा नावाचा एक कोळी मुद्गलऋषींच्या कृपेने गणेशनाम मंत्राच्या अनुष्ठानाने परमपावन झाला. श्री भ्रुशुंडी मुनींच्या अंमलाश्रम येथे होता; म्हणून याला ‘भ्रुशुंडी वरद स्थापित क्षेत्र’ म्हटले जाते. गणेशभक्त निरंजनस्वामी यांचे संस्थान आणि त्यांच्या वंशजांच्या समाधी येथे आहेत. त्यांचे वंशज मंदिराची व्यवस्था पहातात.

भेट गणेश, अंबाजोगाई

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे अंबाजोगाई देवीच्या मंदिरातील एका दगडी स्तंभावर बालगणेशमूर्ती आहे. देवीचे दर्शन घेण्यापूर्वी आणि दर्शन घेतल्यानंतरही या बाल गणेशाचे दर्शन (भेट) घ्यावेच लागते; म्हणून या गणेशाला ‘भेट गणेश’ असे संबोधले जाते.

पाराचा गणेश, अंबाजोगाई

हे गणेश मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले असून ते हेमाडपंथी बांधणीचे आहे. येथील मूळ मूर्ती प्राचीन आणि पुष्कळ लहान आहे. ती सध्या शेजारच्या मंदिरात आहे. मुख्य मंदिरातील मूर्ती दोन अडीच शतकांपूर्वीची असावी, असे सांगितले जाते.