गद्दारांशी मैत्री नकोच ! – रणजित सावरकर

बांगलादेशसमवेत क्रिकेट खेळण्यास विरोध !

श्री. रणजित सावरकर

मुंबई – भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत श्री. रणजित सावरकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ही मालिका १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. याविषयावर सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात रणजित सावरकर म्हणाले, ‘‘भारतीय जनतेने या कसोटी मालिकेवर बहिष्कार घातला पाहिजे. बांगलादेशावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून आपण त्यांना केवळ मान्यताच देत नाही, तर आपण त्यांना अर्थपुरवठाही करत आहोत.’’

हिंदूच मारले जातात, हा इतिहास आहे ! – रणजित सावरकर

बांगलादेशातील नौखाली आणि टिपरा जिल्ह्यात एकही हिंदु उरला नव्हता. आपण सर्वजण इतिहास विसरत चाललो आहोत. त्यानंतर वर्ष १९७१ च्या आधीच्या पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याने जे अत्याचार केले ते हिंदूंवरच केले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर आक्रमण करून त्याचे दोन तुकडे केले. आज इतक्या वर्षांनंतर भारत, पाक आणि बांगलादेश येथील जमात-ए-इस्लामी एकत्र आले आहेत. एका कुटिल षड्यंत्रामुळे बांगलादेशातील सरकार पालटले, आताचे सरकार हे हिंदु आणि भारत विरोधी आहे.