सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
श्री गणेशचतुर्थी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्री गणेशाच्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या पौराणिक आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीचे दोडीताल हे श्री गणेशाचे जन्मस्थान मानले जाते. दोडीतालमध्ये एक सरोवर आहे. या सरोवराजवळ असलेले मंदिर हे श्री गणेशाचे जन्मस्थान मानले जाते. येथे माता अन्नपूर्णाचे मंदिर आहे. ज्याचे दरवाजे उन्हाळ्यात उघडले जातात आणि हिवाळ्यात ते बंद रहातात.
१. दोडीतालमध्ये गणेशासह माता पार्वतीही विराजमान
पौराणिक मान्यतेनुसार उत्तरकाशीच्या दोडीतालमध्ये माता पार्वतीने स्नान करण्यापूर्वी दरवाजाच्या बाहेर रक्षण करण्यासाठी स्वतःच्या मळापासून गणेशाची निर्मिती केली होती. येथील मंदिरात भगवान गणेशाच्या मूर्तीसह त्याची आई पार्वती हिचीही मूर्ती आहे. दोडीताल येथील स्थानिक लोकांच्या बोलीभाषेत गणपतीला ‘दोडी राजा’ म्हणतात, जो केदारखंडमधील गणेशजींच्या दुंडीसर नावाचा अपभ्रंश आहे. येथे आई अन्नपूर्णादेवीचे प्राचीन आणि एकमेव मंदिर आहे, जिथे माता पार्वतीच्या रूपातील आई अन्नपूर्णादेवीची गणेशासह पूजा केली जाते. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक शिवमंदिर आहे. दोडीतालमधील मंदिर हे भगवान गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
२. तलावाची खोली किती ? एक रहस्य
समुद्रसपाटीपासून ३ सहस्र ३१० मीटर उंचीवर असलेल्या सुंदर पर्वतांनी वेढलेले दोडीताल तलावाची खोली एक रहस्य आहे. दोडीताल हा एक ते दीड किलोमीटरवर पसरलेला तलाव आहे. या तलावात आजही श्री गणेश आपल्या आईसह उपस्थित असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. आजही या तलावाची खोली हे गूढच आहे. दोडीताल येथील तलावाच्या खोलीचा कुणालाच अंदाज लावता आलेला नाही. वेळोवेळी अनेक शास्त्रज्ञ आणि वन विभागाच्या अधिकार्यांनी त्याचे मोजमाप करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना अपयश आले.
दोडीताल हे पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनाचे आणि गिर्यारोहणाचे ठिकाण आहे. जे मुख्यालयापासून अगुडा गावापर्यंत रस्त्याने १८ कि.मी. अंतरावर आहे.
– हर्षदा पाटोळे (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)