‘मला काही दिवसांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना संगणकात लिखाणाची धारिका दाखवण्याची सेवा मिळाली होती. त्या वेळी मला त्यांचा स्थुलातून सहवास लाभला. नंतर काही दिवसांनी माझी ती सेवा पालटली. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर मला भेटत नाहीत आणि दिसतही नाहीत’, या विचारांनी मी रडायचे. अजूनही काही वेळा ‘परात्पर गुरु डॉक्टरांना स्थुलातून भेटायला मिळावे’, ही मनातील भावना उफाळून येऊन मी रडते. ‘त्यांना सूक्ष्मातून अनुभवणे’, हे माझ्यासाठी साधन आणि साध्य दोन्ही आहे’, असे मला वाटते.
माझी सेवा पालटल्यावर आरंभी मी बुद्धीने मनाला समजावूनही माझ्या मनावर नियंत्रण रहायचे नाही. हळूहळू मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करायला आरंभ केला, ‘प.पू. डॉक्टर, तुम्हाला कसे अनुभवायचे ?’, हे तुम्हीच मला शिकवा. ‘तुम्ही माझ्या समवेत आहात’, याची मला सतत जाणीव होऊ द्या.’ त्यानंतर मला वाटले, ‘आत्मनिवेदन केल्यावर माझ्या मनात येणारे विचार माझे नसून परात्पर गुरु डॉक्टरांचे विचार आहेत.’ त्यातील काही विचार येथे दिले आहेत.
१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून प्रसाद मिळावा’, असा विचार येणे आणि ‘श्वासोच्छ्वास’ हाच प्रसाद आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सुचवणे
परात्पर गुरु डॉक्टरांकडे सेवेसाठी जात असतांना आणि त्यापूर्वी मी रुग्णाईत असतांना मला अधूनमधून त्यांच्याकडून प्रसाद मिळायचा. एक दिवस आश्रमातील मार्गिकेतून चालत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला बरेच दिवस प्रसाद पाठवला नाही. आता मी त्यांच्याकडे जाऊन स्थुलातून सेवा करत नाही, तर मला प्रसादही मिळाला नाही.’ हा विचार करत असतांना माझे लक्ष आपोआप माझ्या श्वासाकडे गेले. त्या वेळी माझ्या आतून आवाज ऐकू आला, ‘हा श्वास’, हाच मी तुला दिलेला प्रसाद आहे.’ हा विचार येताक्षणी मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
२. प.पू. डॉक्टरांचे ‘साधना भाग – १’ हे प्रवचन प्रतिदिन ऐकणे
२ अ. प्रवचन ऐकल्यावर त्यातील एखादे वाक्य दिवसभर आठवून भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांचे स्थुलातील दर्शन मिळत नसल्याने माझा बराचसा वेळ संघर्षात जायचा. या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘साधना भाग – १’ हे प्रवचन प्रतिदिन ऐकू लागले. हे प्रवचन मी पुनःपुन्हा ऐकत असले, तरी त्या त्या दिवशी त्यातील एखादे वाक्य माझ्या मनाला भावते आणि ते वाक्य दिवसभर माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेते, उदा. ‘ईश्वर एक आहे, बाकी सर्व अनेक आहे; तुम्ही साधनेसाठी जे काही प्रयत्न कराल, त्यात एकच लक्षात ठेवा, तुम्हाला ईश्वराकडे जायचे आहे; गुरु म्हणजे देह नाही, तर गुरुतत्त्व आहे.’
२ आ. प.पू. डॉक्टरांनी प्रवचनात सांगितलेल्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या नियमाचा भावार्थ लक्षात येणे : १.१०.२०२३ या दिवशी मला ‘प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम असतो; एका गोष्टीचा लय होत असतांनाच नवीन गोष्ट उदयास येते’, हे प.पू. डॉक्टरांचे वाक्य भावले. येथे ‘उत्पत्ती’ म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची सगुण सेवा मिळणे; ‘स्थिती’ म्हणजे ती सेवा त्यांना आवडेल अशी करणे आणि ‘लय’ म्हणजे ती सेवा अन्य साधकाकडे हस्तांतरित होणे’, असा अर्थ मला समजला.
३. सूर्याचे दर्शन घेतांना ‘प.पू. डॉक्टरच दर्शन देत आहेत’, असे वाटून ‘ते स्थुलातून कितीही दूर असले, तरी त्यांचे चैतन्य मिळून जीवन प्रकाशमय होणार आहे’, असे वाटणे
२.१०.२०२३ या दिवशी वातावरण ढगाळ होते; पण सकाळ झाल्याचे कळत होते. सूर्य किंचित दिसत होता आणि त्यावरूनच सूर्याचे अस्तित्व सगळ्यांच्या लक्षात येत होते. प.पू. डॉक्टर स्थुलातून दिसत नसले, तरी त्यांचे अस्तित्व माझ्या जीवनात आहे. त्यामुळे माझ्या आजच्या दिवसाला आरंभ झाला आहे. तेव्हापासून ‘सूर्याचे दर्शन घेतांना प.पू. डॉक्टरच मला दर्शन देत आहेत’, असे मला वाटू लागले. सूर्य पृथ्वीपासून लाखो कि.मी. दूर अंतरावर असूनही मानवाचे जीवन प्रकाशमान करतो, तसे प.पू. डॉक्टर आपल्यापासून स्थुलातून कितीही दूर असले, तरी त्यांचे चैतन्य आपल्यापर्यंत पोचून आपले जीवन प्रकाशमय होते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना ‘साधकांचे प्रारब्ध आणि स्वभावदोष’ यांसहित स्वीकारणे
१२.४.२०२४ या दिवशी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा आणि त्यांचे शिष्यत्व’ या ग्रंथातील पान क्र. ५२ वर सूत्र क्र. ४ इ. वरील पुढील परिच्छेद माझ्या वाचण्यात आला.
‘गुरूंनी शिष्याच्या कर्जाचे दायित्व स्वीकारणे : ‘एकदा मी प.पू. बाबांना (प.पू. भक्तराज महाराज यांना) म्हटले, ‘‘आमचे सर्वस्व तुम्हाला दिले, म्हणजे आमचे ८ लाख रुपयांचे कर्जही दिले !’’ त्यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘मलाही ८ सहस्र रुपयांचे कर्ज होते. ते माझ्या गुरूंनी निवारले !’’ अशा प्रकारे गुरु शिष्याचा सर्व प्रकारे सांभाळ करत असतात.’ – डॉ. आठवले.’
वरील परिच्छेद वाचल्यावर मला वाटले, ‘मी तर ‘शिष्य’ बनण्याच्या पात्रतेची नाही, तरीही प.पू. डॉक्टरांनी माझ्यासारख्या अनेक जिवांना त्यांच्या चरणांशी घेतले आहे आणि आम्हाला आमच्या कर्जासहित (प्रारब्ध आणि स्वभावदोष यांसहित) स्वीकारले आहे. या गुरुरूपी अवताराच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
‘प.पू. डॉक्टर, मला अनुभूती येत असल्या, तरी ‘तुम्हाला सतत अनुभवणे आणि तुम्हाला अपेक्षित अशी साधना करणे’, यांसाठी मी अजून पुष्कळ प्रयत्न करायला हवेत. आपणच माझ्याकडून हे प्रयत्न करवून घ्यावेत’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे !’
– सुश्री रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२४)
|