‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ वेब सिरीज : हिंदूंवरील आघात !

‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’चे भित्तीपत्रक

१. पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून भारतीय विमानाचे अपहरण

२५ वर्षांपूर्वी काठमांडूहून देहली येथे जाणार्‍या ‘इंडियन एअरलाईन्स’ विमानाचे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी अपहरण केले होते. या विमानात ११९ प्रवासी आणि ११ ‘क्रू मेंबर’ होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी तत्कालीन सरकारला ५ जिहादी आतंकवाद्यांना सोडावे लागले. या घटनेवर आधारित नुकतीच ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार अपहरण) या नावाची वेब सिरीज बनवण्यात आली आहे आणि त्यात जिहादी आतंकवाद्यांच्या पात्रांची नावे हिंदु दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे ही घटना पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

२४.१२.१९९९ या दिवशी इब्राहिम अतहर (बहावलपूर), शाहिद अख्तर (कराची), सनी अहमद (कराची), जहूर मिस्त्री (कराची) आणि शाकीर (सुक्कुर सिटी) यांनी विमानाचे कप्तान देवी शरण यांना धाक दाखवून या विमानाचे अपहरण केले. त्यानंतर ते अमृतसर विमानतळावर किमान ५० मिनिटे होते. विमानात इंधन भरण्यासाठी ते अमृतसरला थांबवण्यात आले होते; पण त्यांना भीती वाटली; म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये इंधन भरले. त्यानंतर ते अफगाणिस्तानातील कंदहारला नेण्यात आले. ते कंदहारला ६ दिवस राहिले.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. भारत सरकारकडून ३ जिहादी आतंकवाद्यांची सूटका

२८.१२.१९९९ या दिवशी भारत सरकारला आतंकवाद्यांशी बोलणी करावी लागली आणि दुर्दैवाने सरकारने तडजोड मान्य केली. अपहरणकर्त्यांनी सरकारकडे भारतीय कारागृहातील ३६ क्रूर अातंकवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. सरकारने मसूद अझहर, उमर शेख, मुश्ताक जरगर यांना सोडले. यातील मुश्ताक जरगर याच्यावर ४० काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याला कारागृहात डांबले होते. त्यांना सोडण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र्रमंत्री जसवंत सिंह हे ३१.१२.१९९९ या दिवशी या ३ आतंकवाद्यांना घेऊन कंदहारला पोचले. त्यानंतर अपहरण केलेले विमान देहलीला परत आणले गेले. कालांतराने याच जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष २००१ मध्ये भारताच्या संसदेवर आक्रमण केले. सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी ही घटना अपमानास्पद आहे. हिंदूंसाठी तर हा व्रण कधीही भरून न येणारा आहे.

३. तत्कालीन पुळचट कायदे

६०  वर्षे सत्ता उपभोगणार्‍या आणि भ्रष्टाचारात मग्न असलेल्या काँग्रेसने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदे केले नव्हते. त्यामुळे नुकतेच सत्तेत आलेले भाजप आणि मित्र पक्षाचे तत्कालीन सरकार हतबल झाले होते. नंतर कायद्यात आमूलाग्र पालट करण्यात आले. असे म्हणतात की, त्या वेळी तालिबानी आतंकवाद्यांनी २० कोटी अमेरिकी डॉलर्सची खंडणी मागितली होती. यासमवेतच मागितलेली एक काळी सुटकेस आणि २ लाल सुटकेस यांचेही गूढ कायम आहे. असे म्हणतात की, त्या वेळी परराष्ट्र्रमंत्री जसवंत सिंह यांच्या गटासमवेत या ३ सुटकेस नेण्यात आल्या होत्या. त्यापैकी सिंह यांच्याकडील लाल रंगाच्या सुटकेसमध्ये स्फोटके होती.

४. चित्रपट निर्मात्यांकडून दर्शकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ ही वेब सिरीज निर्मित केली आहे. त्यात आतंकवादी पात्रांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली आहेत. वास्तविक हे कृत्य करणारे धर्मांध मुसलमान होते आणि ते पाकिस्तानात रहाणारे होते. त्यामुळे त्यांची हिंदु नावे ठेवणे ही दिशाभूल आहे. कंदहार विमान अपहरण हे जिहादी आतंकवाद्यांनी केले होते, हे फार तर भारतियांना किंवा हिंदूंना पुढच्या २५ वर्षापर्यंत ठाऊक राहील. त्या पुढील पिढीला या चित्रपटावरून हे अपहरण हिंदु व्यक्तींनी केले, असेच वाटेल. हे षड्यंत्र लक्षात आल्यावर या वादग्रस्त वेब सिरीजच्या विरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.

५. केंद्र सरकारची ‘नेटफ्लिक्स’ला समज

या प्रकरणी केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी ‘नेटफ्लिक्स’ला समन्स पाठवून बोलावले आणि त्यांना कठोर शब्दांत समज दिली. त्यानंतर ‘राष्ट्राच्या भावना राखण्यात येईल आणि भविष्यात सादर होणार्‍या कलाकृतींविषयी काळजी घेऊ’, असे आश्वासन ‘नेटफ्लिक्स’च्या भारतातील प्रमुख मोनिका शेरगिल यांनी केंद्र सरकारला दिले. यासमवेतच जिहादी आतंकवाद्यांची नावे दाखवण्याचे वचनही घेतले. यासंदर्भात वेब सिरीजचे संचालक मुकेश छाब्रा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्या विमानात प्रवास करणारे प्रवासी आजही जिवंत आहेत. त्यांनीही या प्रकाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘चोराच्या उलट्या बोंबा’, या उक्तीप्रमाणे ‘नेटफ्लिक्स’ने सांगितले, ‘‘आम्ही जिहादी आतंकवाद्यांची नावे मालिका चालू होतांना सर्वप्रथम आणि स्पष्टपणे नमूद करत आहोत.’’

६. वेब सिरीजच्या विरोधात हिंदु सेनेची देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका

या वेब सिरीजच्या विरोधात हिंदु सेनेने देहली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका प्रविष्ट केली आणि या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांच्या मते या वेब सिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या.

७. राजकीय पक्षांच्या सोयीच्या प्रतिक्रिया

एवढी गंभीर गोष्ट असतांना दुर्दैवाने विरोधी आणि सत्ताधारी राजकीय पक्षांचे प्रवक्ते अप्रत्यक्षपणे धर्मांधांचे अनुनय करत आहेत. त्यांच्या मते तत्कालीन भाजप सरकारने कचखाऊ भूमिका घेतल्याने हा प्रसंग ओढवला. धर्मांधांना त्यांच्या चुकीविषयी निर्भत्सना करायची पाळी येते, त्या वेळी आपले राजकारणी कचखाऊ भूमिका घेतात. त्यांची बाजू घेतल्यामुळे धर्मांधांना सरकार, पोलीस किंवा कायदा यांचे भय वाटत नाही. त्यामुळे गेली ७७ वर्षे देशात आतंकवाद बोकाळलेला आहे. जन्महिंदू आणि राष्ट्रविरोधी राजकीय पक्ष आतंकवाद्यांच्या विरोधात प्रखर राष्ट्रप्रेम दाखवत नाहीत. त्यामुळे कदाचित आपल्याला येथून पुढे दुष्प्रवृत्तींचा नायनाट करणे अशक्य वाटते.’ (८.९.२०२४)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

-(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

संपादकीय भूमिका

अशा राष्ट्रद्रोही वेब सिरीजची निर्मिती न होण्यासाठी सरकारने परिनिरीक्षण मंडळ बनवण्यासह राष्ट्रद्रोह्यांना वचक बसेल, असा कठोर कायदा बनवणे आवश्यक !