गणेशोत्सव विशेष…
भारतीय पारतंत्र्याचा वर्ष १८९० नंतरचा काळ होता. इंग्रजांच्या कारकीर्दीत भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच जनमानस एकत्र येत नव्हते. वर्ष १८९३ च्या मुंबई आणि पुण्ो येथील हिंदू-मुसलमान दंगलींमध्ये इंग्रज सरकारने मुसलमानांची बाजू घेतली अन् त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे लोकमान्य टिळक यांना आवश्यक वाटत होते. ‘स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच’, असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते ‘भारतियांच्या दुर्बलतेची २ कारणे होती. एक म्हणजे भारतियांचा हरवलेला आत्मविश्वास आणि दुसरे म्हणजे लुप्त होत असलेली एकीची भावना ! जोपर्यंत लोकांचा त्यांचा धर्म, संस्कृती आणि इतिहास यांविषयीचा आदर परत वृद्धींगत होत नाही, तोपर्यंत राजकीय अन् सामाजिक स्वातंत्र्य दुरापास्त आहे, हे ते जाणून होते. ग्रीक संस्कृतीत ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ प्रत्येक ४ वर्षांनी होणारे ‘ऑलिंपिक’ ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते.
याच धर्तीवर वर्ष १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी प्रयत्न करण्याचे ठरवले. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकांना विरोध होता; पण धर्माच्या संदर्भात ते हस्तक्षेप करण्यास सहसा धजावत नसत. याचाच लाभ टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. हिंदूंमध्ये घराघरांत होणार्या उत्सवाला टिळकांनी १० दिवस चालणार्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे २ उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटीशविरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढावा. स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती, लोकसंघटन, लोकसंग्रह या प्रमुख कारणांसाठी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले गेले. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव आणि समाजप्रबोधन यांचे कार्य पुण्यातून होऊ लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्यानमाला आयोजित करून तज्ञांचे मार्गदर्शन, देखाव्याच्या माध्यमातून जनतेला संदेश देणे, गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून मनोरंजन करणे, समाजविधायक कामे करणे इत्यादी रितीने धार्मिक पातळीवर जनतेला यशस्वीरित्या एकत्र आणले. यानंतर टिळकांनी राजकीय विषयावर लोकांना एकत्र करण्याचे प्रयत्न चालू केले. त्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल, असा विश्वास त्यांना होता. यातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत प्रज्वलित केली.
सध्या हा उत्सव विकृत होऊन त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण, भांडवलशाही आणि विज्ञापन यांची बाधा झाली आहे. उत्सवाच्या मूळ उद्देशापासून फारकत झाली आहे. जुगार, अश्लील गाणी आणि त्यावर हिडिस नृत्य, मद्यपान, कर्णकर्कश आवाज, देवतांचे विडंबन हे अपप्रकार पूर्णत: बंद होऊन या उत्सवाला मूळचे सात्त्विक स्वरूप प्राप्त करून देणे, हीच खरी गणेशभक्ती ठरेल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.