Canada govt in risk : खलिस्‍तान समर्थक जगमीत सिंह यांनी पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला !

ट्रुडो सरकार अल्‍पमतात !

खलिस्‍तान समर्थक जगमीत सिंह आणि पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे(Canada) पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्‍या सरकारला मोठा झटका बसला आहे. खलिस्‍तान समर्थक न्‍यू डेमोक्रॅटिक पार्टी (एन्.डी.पी.) या पक्षाचे नेते जगमीत सिंह(Jagmeet Singh)  यांनी सरकार दिलेला पाठिंबा काढून घेण्‍याची घोषणा केली आहे. जगमीत सिंह यांनी ट्रुडो यांच्‍यावर अनेक आरोप करत पाठिंबा काढून घेतला आहे. ट्रुडो यांचे सरकार एन्.डी.पी.च्‍या पाठिंब्‍यावर चालत होते. त्‍यामुळे ट्रुडो सरकार अल्‍पमतात आले आहे. आता त्‍यांना विश्‍वासदर्शक ठरावासाठी इतर पक्षांकडे पहावे लागणार आहे. जगमीत सिंह यांनी पुढील निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीत स्‍वत:ला घोषित केले आहे.

जगमीत सिंह यांनी पंतप्रधान ट्रुडो यांच्‍यावर आरोप केला की, ते कंझर्व्‍हेटिव्‍ह पक्षाचा सामना करू शकत नाहीत. सध्‍याचे सरकार कमकुवत, स्‍वार्थी आणि व्‍यापारी हितासाठी समर्पित आहे. ट्रुडो उद्योगपतींना शरण गेले आहेत. आता त्‍यांना दुसरी संधी देण्‍यासाठी ते पात्र नाही.

ट्रुडो यांच्‍यासमोर आता कोणते पर्याय आहेत?

जगमीत सिंह यांनी पाठिंबा काढून घेतल्‍याने ट्रुडो यांच्‍याकडे आता पद सोडण्‍याचा आणि लवकर निवडणुका घेण्‍याचा पर्याय आहे. ट्रुडो यांना अर्थसंकल्‍प संमत करण्‍यासाठी आणि संसदेते विश्‍वासदर्शक ठराव टाळण्‍यासाठी नवीन युती करण्‍याची आवश्‍यकता असेल. जस्‍टिन ट्रुडो वर्ष २०१५ पासून सत्तेत आहेत.

संपादकीय भूमिका

कॅनडातील सरकार टिकवणे आणि पाडणे इतकी शक्‍ती निर्माण करणार्‍या खलिस्‍तानवाद्यांच्‍या मुसक्‍या कॅनडा आवळणार का ?