राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण
मालवण – राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आणि अन्य गंभीर कलमांच्या अतर्गत मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी डॉ. पाटील यांना पोलिसांनी कोल्हापूर येथून कह्यात घेतले. ३० ऑगस्टला डॉ. पाटील यांना मालवण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे साहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा पुतळा उभारतांना आवश्यक अशी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक होते; परंतु हा पुतळा कोसळला, तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक आणि इतर लोकांचे मृत्यू होतील, तसेच अपरिमित जीवित आणि वित्त हानी होईल, याची पूर्ण जाणीव असतांनाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले गेले. या पुतळ्याच्या उभारणीचा अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केले, असे या तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. पाटील यांना ३१ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे, तर गुन्ह्यातील शिल्पकार जयदीप आपटे यांचाही शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.