पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती !

राजकोट दुर्गावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण

श्री. दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

मुंबई – राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी स्वत:च्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारतांना पुतळा उभारण्याविषयीची नियमावली का पाळण्यात आली नाही ? पुतळा धोकादायक स्थितीत असल्याविषयी अनेकांनी राज्य सरकारला पत्र पाठवले होते, त्यांची नोंद का घेण्यात आली नाही ? पुतळ्याचे उद्घाटन घाईगडबडीत का करण्यात आले ?, या पत्रकारांच्या प्रश्‍नांना दीपक केसरकर यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास !

मंत्री केसरकर म्हणाले की, ‘वाईटातून चांगले होईल’, या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराजांचा पुतळा पडला ही अत्यंत दु:खदायक घटना घडली आहे; मात्र यातून या ठिकाणी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल, ही यातील चांगली गोष्ट आहे, असे केसरकर म्हणाले. या वेळी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी प्रश्‍न विचारल्यानंतर दीपक केसरकर यांनी त्यांचे कॅमेरे काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

पुतळा नौदलाने उभारून महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केला होता !

मंत्री केसरकर पुढे म्हणाले, ‘‘पुतळा उभारतांना केवळ निविदा काढून उपयोग नाही. मूर्तीकारांचा अनुभवही पहायला हवा. यापूर्वी उभारलेले पुतळे शेकडो वर्षे टिकले आहेत. हा पुतळा नौदलाने उभारून महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केला होता. या वर्षी प्रथमच नौदल दिन मुंबईच्या बाहेर छत्रपती शिवरायांनी आरमार उभारले, त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. आमचा हेतू चांगला होता. भविष्यात नौदल आणि महाराष्ट्र सरकार यांनी राजकोट येथे १०० फुटांचा पुतळा उभारावा.’’