अक्षय महाराज भोसले यांच्याकडून शरद पवार यांना विविध हिंदु धर्मग्रंथ भेट देण्याचे विधान !
पुणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २५ ऑगस्टला पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. युगेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार्या या संमेलनाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी, ‘शरद पवार यांना गीता, रामायण, महाभारत, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथ भेट देणार आहे. हे ग्रंथ वाचल्यानंतरच शरद पवार यांनी वारकर्यांना मार्गदर्शन करावे’, अशा स्वरूपाचे विधान केले असल्याचे सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांनी कोणतेही ग्रंथ शरद पवार यांना भेट देऊ नयेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास आपल्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस अक्षय महाराज भोसले यांना पुणे पोलिसांनी बजावली आहे.
संमेलनाच्या अनुषंगाने अक्षय महाराज भोसले यांचा एक व्हिडिओ प्रसारित होत असून त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांना उद्देशून ‘आपले म्हणणे होते की, देशाला रामायण आणि महाभारत या सारख्या ग्रंथांची आवश्यकता नाही; परंतु दुसरीकडे आपण वारकरी संमेलन घेत आहात. त्यामुळे ग्रंथ वाचल्यानंतरच शरद पवार यांनी वारकर्यांना मार्गदर्शन करावे’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :हिंदूबहुल भारतात एखाद्याला हिंदु धर्मग्रंथ भेट देण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल, असे पोलिसांना वाटणे म्हणजे भारतात पाकसारखी स्थिती निर्माण झाली असे समजायचे का ? |