पिंपरी (पुणे) – फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, लाईम रोड, बिग बास्केट अशा विविध आस्थापनांमध्ये ई-रिक्शा भाडेतत्त्वावर लावून प्रतिमास ३१ सहस्र रुपये भाडे कमवा, असे आमीष दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील ७३२ गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोएडा (उत्तरप्रदेश) येथे कह्यात घेतले. संदीपकुमार लाल बहादूर आणि सीमा मित्तल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी वाकड भूमकर चौकातील ‘व्हिजन वन’ मॉलमध्ये ‘रेंटोला इंडिया’ नावाचे आस्थापन चालू केले होते. त्यांनी आस्थापनाच्या नावाने गुंतवणूकदारांसाठी ‘आकर्षक गुंतवणूक योजना’ सिद्ध करून परताव्याची योजना केली होती.
गुंतवणूकदारांना त्यांनी ई-रिक्शासाठी १ लाख ११ सहस्र रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले, तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या काही रिक्शा आस्थापनाच्या शोरूममध्ये डेमो रिक्शा म्हणून ठेवल्या. काही रिक्शा थेरगाव येथील पार्किंग जागेत बेवारसरित्या पार्क करून ठेवल्या. आरोपींनी ७३२ गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक योजनेसाठी ७ कोटी रुपयांची रक्कम विविध मार्गाने स्वीकारली. त्यानंतर आस्थापन बंद करून ते पळून गेले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
संपादकीय भूमिका :फसवणूक करणार्यांची संख्या वाढणे, हे गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक ! |