नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती आढळल्यास १० सहस्र दंड !

  • श्री गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे निर्बंध हटवले !

  • नागपूर महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क यंदा नसणार !

 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) गणेशमूर्तींवर बंदी

नागपूर – गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य सरकारचे नियम यांचे पालन करावे लागेल. यंदा मूर्तीकार आणि विक्रेते यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची निर्मिती, साठवणूक किंवा विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास मूर्ती जप्त करण्यासमवेत १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे, असे नागपूर महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

नागपूर महापालिकेने यंदा भाविकांना श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणे अनिवार्य केले आहे. (कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन केल्यावर मूर्तीची कशी विटंबना होते, हे सर्वश्रूत आहे ! – संपादक) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध वर्ष २०२४ च्या गणेशोत्सवासाठी असणार नाहीत; तथापि श्री गणेशमूर्तींचे विसर्जन फक्त कृत्रिम तलावामध्येच करायचे असल्याने ४ फुटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील तलावात करण्यात येणार आहे. घरगुती गणेशमूर्तींसाठी या अगोदर २ फूट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती. या वर्षी घरगुती गणेशमूर्तींसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही; परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने २ फूट उंचीच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (महापालिकेने शास्त्रानुसार शाडूच्या अल्प फूट उंचीच्या मूर्ती वापरण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे ! – संपादक)

येथील महापालिकेकडून गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांकडून वििवध सुविधांसाठी आकारण्यात येणारे शुल्क यंदा पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सूचना केली होती. गणेशोत्सव २०२४ साठी साफसफाई शुल्क ५०० रुपये, अग्नीशमन विभागाकडून आकारण्यात येणारे ७५० रुपये आणि स्वच्छता विभागाकडून आकारण्यात येणारे १ सहस्र रुपयांचेही शुल्क यंदा नसेल.