‘पडलो तरी नाक वर’, ही प्रवृत्ती खेळाडूंसाठी धोकादायक !

१. ऑलिंपिक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यासाठी भारताची कुस्‍तीपटू विनेश फोगाट अपात्र घोषित

‘नुकत्‍याच पॅरिसमध्‍ये ऑलिंपिक स्‍पर्धा झाल्‍या. त्‍यात विनेश फोगाट ही भारतीय कुस्‍तीपटू ५० किलो वजनाच्‍या स्‍पर्धेत खेळली. तिने उपांत्‍य फेरीत तिच्‍या प्रतिस्‍पर्ध्‍याला हरवले. दुसर्‍या दिवशी ती अंतिम फेरीची कुस्‍ती खेळणार होती. त्‍या दिवशी ती सुवर्ण किंवा रौप्‍य पदक मिळवेल, असे तिच्‍या समर्थकांना वाटत होते. ज्‍या दिवशी विनेश फोगाट अंतिम फेरीत गेली, त्‍याच दिवशी सामाजिक माध्‍यमांवर तिचे गुणगान करणारे लिखाण प्रसारित करण्‍यात आले. सामाजिक माध्‍यमांवर असे लिहिले गेले, ‘ती लढवय्‍यी आहे. जागतिक कुस्‍ती महासंघाचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खेळाडूंवर लैंगिक अत्‍याचार केला. त्‍या विरोधात साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्‍यासह विनेश फोगाटही लढली. तुम्‍ही जरी तिला फरफटत नेले आणि अपमानित केले, तरी ती अंतिम स्‍पर्धेत विजय मिळवून लवकरच सुवर्ण पदक मिळवेल.’

कुठल्‍याही खेळाडूचे कौतुक झाले, तर त्‍यात भारतियांच्‍या दृष्‍टीने चुकीचे काही नाही; परंतु खेळाडूला पुढे करून सरकारवर किंवा पंतप्रधानांवर टीका करणे कितपत योग्‍य आहे ? अंतिम सामन्‍याच्‍या आदल्‍या रात्री विनेश फोगाटचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅमने अधिक झाले होते. त्‍यामुळे अधिकचे वजन न्‍यून करण्‍यासाठी तिने पूर्ण रात्र आणि दुसरा दिवस पुष्‍कळ प्रयत्न केले. एवढे करूनही तिचे वजन १०० ग्रॅमने अधिक भरले. त्‍यामुळे ती अपात्र घोषित झाली. त्‍यानंतर भारतभरात प्रचंड मोठा गदारोळ करण्‍यात आला की, जणू तिला भारत सरकारच्‍या आदेशानुसार अपात्र घोषित करण्‍यात आले.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. विनेश फोगाटचा पात्रता फेरीतील इतिहास 

या प्रकरणातील पात्रता फेरी निकषाचा (यापूर्वीचा) इतिहास पाहूया. पात्रता फेरीत विनेश फोगाट ही ५३ किलो आणि ५० किलो या दोन्‍ही वजनी गटांमध्‍ये खेळली. ५३ किलो गटात तिला अंजू नामक कुस्‍तीपटूने हरवले आणि ५० किलो वजनी गटात ती जिंकली. तेव्‍हापासून तिने ५० किलो वजनी गटात खेळण्‍याचा निर्णय घेतला. जेव्‍हा खेळाडू नियमित वजन न्‍यून करून खेळायला जातो, तेव्‍हा न्‍यून केलेले वजन स्‍थिर रहाण्‍यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्‍यात जोखीमही पत्‍करावी लागते. ऑलिंपिकमधील अंतिम फेरीच्‍या पूर्वी खेळतांना तिच्‍या शरिरातील पाणी न्‍यून झाले होते. त्‍यामुळे तिला द्रव स्‍वरूपात अन्‍न (लिक्‍विड डायट) देण्‍यात आले होते. रात्री तिचे वजन दोन ते अडीच किलो अधिक भरले. हे वजन न्‍यून करण्‍यासाठी तिचे प्रशिक्षक, सहकारी आणि साहाय्‍यक कर्मचारी यांनी तिच्‍याकडून नानाविध व्‍यायाम अन् अन्‍य प्रकार करून घेतले. डॉ. पारडीवाला म्‍हणाले, ‘‘२-३ लढती खेळल्‍यामुळे शरिरातील पाणी न्‍यून होऊ शकते. त्‍यामुळे तिला ‘लिक्‍विड डायट’ द्यावे लागले. अन्‍यथा ती अंतिम लढत खेळू शकली नसती; मात्र दुर्दैवाने तिचे वजन १०० ग्रॅमने अधिक भरले. अर्थात् ती अपात्र घोषित झाली आणि कोणतेही पदक मिळवू शकली नाही. सरकारने तिच्‍या एकट्यावर ७० लाखांहून अधिक रुपयांचा व्‍यय केला होता. आधुनिक वैद्य, प्रशिक्षक, ‘सपोर्ट स्‍टाफ’ (साहाय्‍यक कर्मचारी) असे सर्व तिच्‍या दिमतीला होते, तरीही स्‍पर्धेत आपल्‍याला थोडा अल्‍प विरोध होईल, असे वाटून ती खेळली.

३. विनेश फोगाटसाठी विरोधी पक्षाच्‍या खासदारांचा थयथयाट

फोगाटची अंतिम फेरी चुकल्‍यानंतर भारताच्‍या संसदेत तिला समर्थन देणार्‍या विरोधी पक्षाच्‍या खासदारांनी गदारोळ केला आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. क्रीडामंत्र्यांनी वास्‍तविकता सांगितली, ती ऐकून घेण्‍याच्‍या कुणीही मनस्‍थितीत नव्‍हते. याप्रकरणात स्‍वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विनेश फोगाट हिच्‍याशी बोलले आणि तिचे सांत्‍वन केले. यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. यावरून तिसर्‍या दिवशीही संसदेत गदारोळ करण्‍यात आला. तृणमूल काँग्रेसच्‍या खासदारांनी, तर ‘तिला राष्‍ट्रपती नियुक्‍त खासदार म्‍हणून राज्‍यसभेत पाठवावे, तसेच तिला भारतरत्न द्यावे’, अशीही मागणी केली. केवळ कुस्‍ती महासंघाचे माजी अध्‍यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्‍याविरुद्ध बोलली; म्‍हणून विरोधी पक्षांनी तिचे एवढे कौतुक केले.

४. ऑलिंपिकमध्‍ये पदक मिळवणारे खेळाडू कौतुकाचे खरे वारसदार !

वास्‍तविक ऑलिंपिक किंवा आशियाई स्‍पर्धांमध्‍ये एकाहून एक खेळाडूंनी त्‍यांचे  कौशल्‍य दाखवलेले आहे. याच ऑलिंपिक स्‍पर्धेत मनू भास्‍कर या खेळाडूने २ वेळा पदक प्राप्‍त केले. एकाच ऑलिंपिक स्‍पर्धेत एकाच वर्षी २ पदके मिळवणारी भारतातील ती एकमेव महिला खेळाडू आहे. तिच्‍या अलौकिक कामगिरीविषयी विरोधी पक्षाने तिचे थोडेही कौतुक केल्‍याचे दिसले नाही. तिच्‍यासह श्रीजेश आणि नीरज चोप्रा यांनीही पदके मिळवली आहेत; परंतु केवळ विनेश फोगाटने सरकारच्‍या एका प्रतिनिधीला विरोध केला; म्‍हणून तिचे कौतुक करण्‍यात आले.

५. अपात्रतेच्‍या विरोधात ‘कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन इन स्‍पोर्ट्‍स’मध्‍ये (खेळासाठीच्‍या लवाद न्‍यायालयात) आव्‍हान

विनेश फोगाटच्‍या अपात्रतेच्‍या विरोधात ‘कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन इन स्‍पोर्ट्‍स’मध्‍ये आव्‍हान प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आले. तिथे तिने २ अपिल (याचिका) केले होते; परंतु एक अपिल असंमत झाले. याप्रकरणात भारताचे प्रख्‍यात ज्‍येष्‍ठ विधीज्ञ हरिश साळवे युक्‍तीवादासाठी उपस्‍थित झाले होते. हीसुद्धा याचिका न्‍यायालयाने फेटाळून लावली.

विनेश फोगाट हिच्‍या मते तिने कुणाचीही फसवणूक केली नाही. नैसर्गिकपणे वजन काही ग्रॅमने वाढू शकते. यापूर्वी केवळ वजन अधिक ठरल्‍यावरून बबिता फोगाट आणि पप्‍पू यादव हेही ऑलिंपिक अन् अन्‍य जागतिक स्‍तरावर होणार्‍या कुस्‍ती स्‍पर्धांमधून किंवा अन्‍य खेळांमधून अपात्र ठरवण्‍यात आले होते. स्‍वतः विनेश फोगाटही वर्ष २०१६ च्‍या ऑलिंपिक स्‍पर्धेसाठी वजन अधिक असल्‍याच्‍या कारणाने अपात्र घोषित झाली होती.

६. खेळाडूंनी कोणत्‍याही स्‍पर्धेत यश मिळवण्‍यासाठी खडतर प्रयत्नांंची सिद्धता ठेवणे आवश्‍यक !

एका स्‍तंभलेखकाने त्‍याच्‍या लेखात मनोज कुमार शर्मा (भारतीय पोलीस सेवा – आय.पी.एस्.) यांच्‍या जीवनावर नुकताच येऊन गेलेल्‍या चित्रपटाचा संदर्भ दिला. ‘कॉपीसारख्‍या कोणत्‍याही खोट्या मार्गाचा अवलंब न करता केवळ खडतर प्रयत्न करून ते ‘आय.पी.एस्.’ अधिकारी झाले. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनीच नाही, तर खेळाडूंनीही त्‍यांचा आदर्श घेऊन प्रयत्न करावेत.’ अर्जुन पुरस्‍कार विजेते आणि नामवंत कुस्‍तीगीर प्रशिक्षक कृपाशंकर बिश्‍नोई यांनी ७ वर्षाखाली सर्व कुस्‍तीगिरांना असे सांगितले होते, ‘तुम्‍ही २ दिवसांच्‍या कुस्‍त्‍या खेळण्‍याची सिद्धता ठेवा.’ आशियाई खेळ आणि ऑलिंपिक यांच्‍या नियमांमध्‍ये भेद आहेत. ऑलिंपिकमध्‍ये पहिल्‍या दिवशी वजन केले जाते आणि नंतर सामना होतो. त्‍यानंतर जेव्‍हा दुसर्‍या दिवशी अंतिम लढत असते, तेव्‍हा त्‍या मल्लाचे परत एकदा वजन केले जाते. प्रत्‍येक फेरीत तो पात्र ठरला, तरच त्‍याला संधी दिली जाते. अन्‍यथा तो अपात्र ठरतो. विनेश अपात्र ठरण्‍याच्‍या २ दिवस आधी प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी ‘एक्‍स’वरून सांगितले होते, ‘प्रत्‍येक खेळाडूंनी त्‍याचे दायित्‍व काय आहे ?, ते समजून घेऊन स्‍वतःला सिद्ध करावे. तिच्‍याविषयी सर्वांना सहानुभूती असली, तरी शेवटी खेळाचे नियम हे प्रत्‍येकालाच मान्‍य करावे लागतात.’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ।

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (१०.८.२०२४)

संपादकीय भूमिका

एकाच ऑलिंपिक स्‍पर्धेत २ पदके मिळवणार्‍या एकमेव महिला खेळाडूचे कौतुक न करणार्‍या विरोधी पक्षांचा दुटप्‍पीपणा जाणा !