कोल्हापूर – ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानां’तर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ऑगस्टला तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारकाईने नियोजन करून स्वत:ची दायित्वे चोख पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘कार्यक्रमाचे गाव आणि तालुकानिहाय नियोजन करा. लाभार्थ्यांना खाण्याची पाकिटे, अल्पाहार, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था यांचे योग्य नियोजन करा. कार्यक्रमस्थळी करण्यात येणारी बैठक व्यवस्था आणि अन्य व्यवस्थेच्या कामी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयंसेवकांचे साहाय्य घ्या.’’
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रम नियोजनाचा आढावा घेतला. बैठकीनंतर तपोवन मैदानावरील कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकार्यांनी पहाणी केली. या वेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्. कार्तिकेयन यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.