पुणे महापालिकेकडून ‘मोबाईल विसर्जन टाक्यां’विषयी पुनर्विचाराची शक्यता !

  • करदात्यांच्या पैशांची पुष्कळ उधळपट्टी होत असल्याचा प्रशासनावर आरोप !

  • अत्यल्प प्रतिसाद, तसेच उपक्रमावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर निर्णय !

संग्रहित छायाचित्र

पुणे – कोरोना महामारीच्या काळात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभ करण्यासाठी फिरत्या (मोबाईल) विसर्जन टाक्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला होता; परंतु सर्व निर्बंध उठल्यानंतरही तो चालूच राहिला. लोक आता मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाणवठ्यांवर जातात. या फिरत्या विसर्जन टाक्यांना लोकांचा प्रतिसाद अल्प आहे. केवळ १० टक्के लोक या सेवेचा वापर करतात. ‘या प्रकल्पावर प्रशासन करदात्यांच्या पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करत आहे’, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रशासन नागरिकांच्या म्हणण्याचा कधी विचार करणार ? – संपादक) या उपक्रमावर सर्व स्तरांतून टीका झाल्यामुळे आणि गेल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुणे महानगरपालिका या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी फिरत्या विसर्जन टाक्यांच्या वापरावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी विरोधाला न जुमानता नागरी संस्थेने १५० फिरत्या विसर्जन टाक्या आणल्या. प्रत्येक प्रभाग कार्यालयात फिरत्या टाक्या आहेत. गेल्या वर्षी जवळपास २६ सहस्र भाविकांनी फिरत्या विसर्जन टाक्यांच्या सेवेचा वापर केला होता. नागरी संस्थेने २५२ मूर्तीदान केंद्रांसह २६५ ठिकाणी ४२ काँक्रीट पाण्याच्या टाक्या आणि ५६८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

संपादकीय भूमिका 

फिरत्या (मोबाईल) विसर्जन टाक्यांत विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होत असते. यात कुठल्याही प्रकारे गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळेच या उपक्रमाला नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला, हे महापालिकेने लक्षात घ्यावे !

(मोबाईल विसर्जन टाक्या म्हणजे फिरते विसर्जन हौद)