न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे १८ ऑगस्ट दिवशी होणार्या ४२ व्या वार्षिक भारतदिनाच्या संचलनामध्ये अयोध्येतील श्रीराममंदिराच्या देखाव्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर हिंदुद्वेष्ट्यांकडून टीका होऊ लागली आहे, असे आयोजकांनी सांगितले.
संचलनाचे आयोजक असणार्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन’ने एक निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, आम्ही एक शांततापूर्ण सामुदायिक उत्सव आयोजित करत आहोत; परंतु आमची कठोर तपासणी केली जात आहे. आमच्या समर्पित स्वयंसेवकांनी भारतदिनाची सिद्धता करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले जात असतांना तपासणी केली जाणे दुर्दैवी आणि द्वेषपूर्ण आहे. कोट्यवधी हिंदूंसाठी महत्त्वाच्या असलेल्या पवित्र धार्मिक स्थळाचा संचलनामध्ये सहभाग असणे अवमानकारक असल्याचे म्हटले जात आहे. आमचा प्रश्न आहे की, इतर कोणत्याही समुदायाच्या धार्मिक स्थळाचा अवमान सहन केला जाईल का ? याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे.