Russia-Ukraine war : रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनकडून भारतीय आस्थापनांच्या तोफगोळ्यांचा वापर !

रशियाच्या विरोधानंतरही भारताने हस्तक्षेप केला नाही !

कीव (युक्रेन) – युक्रेन रशियाविरुद्धच्या युद्धात भारतीय तोफगोळे वापरत आहे. भारतीय शस्त्रास्त्रांच्या उत्पादकांच्या वतीने ते युरोपीय देशांना विकले गेले. नंतर ते युक्रेनला पाठवण्यात आले. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे. रशियाच्या विरोधानंतरही भारताने हा व्यापार थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण एका वर्षाहून अधिक काळ चालू आहे, असे ‘रॉयटर्स’ च्या वृत्तात म्हटले आहे.

१. या वृत्तात ३ भारतीय अधिकार्‍यांचा संदर्भ देत म्हटले आहे की, रशियाने किमान २ वेळा हे सूत्र उपस्थित केले आहे. यात जुलैमध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि डॉ. एस्. जयशंकर यांच्यातील बैठकीचाही समावेश आहे. याविषयी रशिया आणि भारत यांच्या संरक्षण मंत्रालयांनी यासंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. जानेवारीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, भारताने युक्रेनला तोफखाना विकलेला नाही.

२. वृत्तात पुढे म्हटले आहे की, या युद्धात भारतीय शस्त्रांचा वापर फार अल्प प्रमाणात करण्यात आला आहे. युक्रेनने आयात केलेल्या सर्व दारुगोळ्यांपैकी हा दारुगोळा एक टक्क्याहून अल्प आहे. युरोपीय देशांनी तो युक्रेनला दान केला कि विकला ?, हे समजू शकले नाही.

३. युक्रेनला भारतीय युद्धसाम्रगी पाठवणार्‍या युरोपीय देशांमध्ये इटली आणि झेक प्रजासत्ताक यांचाही समावेश आहे. ‘यंत्र इंडिया’ची शस्त्रेही रशिया-युक्रेन युद्धात वापरली जात आहेत.