वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारताची फाळणी करायची ठरवली आणि त्यामुळे नवीन देशांच्या सीमानिश्चिती वगैरे गोष्टींसमवेत सैन्यदलांची फाळणी करणे अनिवार्य होते. ब्रिटीशशासित अखंड भारताचा कमांडर-इन-चीफ फिल्ड मार्शल सर क्लॉड ऑखिनलेक याच्यावर ही सैन्याची फाळणी करायचे दायित्व येऊन पडले.
वर्ष १८५७ च्या सैनिकी उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य जाऊन ब्रिटीश सरकारचे राज्य भारतावर चालू झाले. ‘कंपनी’च्या बेंगॉल आर्मी, मद्रास आर्मी आणि बाँबे आर्मी या एकत्रित करून त्यांची ‘इंडिया आर्मी’ बनवण्यात आली. वर्ष १९०२ ते १९०९ या कालावधीत लॉर्ड किचनरने बर्याच सुधारणा आणि पालट केले. ‘इंडिया आर्मी’ला बरेचदा ब्रिटीश साम्राज्यातील इतर वसाहतींमध्येही युद्धासाठी वगैरे पाठवण्यात येऊ लागले. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धातही या भारतीय सैनिकांनी नेत्रदीपक कामगिरी करून दाखवलेली होती. अखेर १९४७ वर्ष आले आणि सुमारे २५० वर्षांचा एकत्र इतिहास असणार्या या सैन्यदलांची फाळणी करायचे ठरले.
वर्ष १९४५ मध्ये अखंड भारताकडे चार सैन्य मुख्यालये होती. नॉर्थ वेस्टर्न आर्मी, सदर्न आर्मी, इस्टर्न आर्मी, सेंट्रल कमांड. यातील नॉर्थ वेस्टर्न आर्मी नव्या ‘पाकिस्तान आर्मी’चे सैन्य मुख्यालय बनवायचे ठरवले गेले. बाकीची तीन मुख्यालये भारताकडे द्यायचे ठरले. एकूण ४ लाखांहून अधिक सैनिकांपैकी २ लाख ६० सहस्र हिंदु जाट, शीख वगैरे सैनिक भारताला दिले गेले, तर उरलेले मुख्यत्वेकरून मुसलमान सैनिक पाकिस्तानला दिले. काही पाकिस्तानी सैनिकी युनिट्सनी हिंदु-शीख सैनिकांच्या ऐवजी त्यांच्याकडे मुसलमान सैनिक मागून घेतले. नेपाळमधली गुरखा ब्रिगेड भारत आणि ब्रिटनने वाटून घेतली. अखंड भारतात असलेले सर्व इंग्रज सैनिक ब्रिटनला परत पाठवायचे ठरले. सैनिक हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बरेचसे ब्रिटीश अधिकारी तात्पुरते मागे राहिले. जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट भारताचे तात्पुरते ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ बनले, तर त्यांचेच इंग्लंडमधले मित्र जनरल सर फ्रँक मेसर्व्ही पाकिस्तानचे तात्पुरते ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ बनले.
सर्वांत शेवटी ब्रिटीश सरकारशासित दिल्लीतील ‘इंडिया आर्मी’ कार्यालयामधून एक विशेष ‘ऑर्डर’ काढण्यात आली की – ‘ही शेवटची ‘इंडिया आर्मी ऑर्डर’ असेल आणि यापुढे ‘इंडिया आर्मी’ ऑर्डर्स (ज्या पूर्वी ब्रिटीश सरकारकडून अखंड भारतातील सैन्य मुख्यालयांसाठी निघायच्या !) काढल्या जाणार नाहीत.’ या विशेष ऑर्डरवर दिनांक आहे ‘१४ ऑगस्ट १९४७’ आणि खाली कमांडर-इन-चीफ फिल्ड मार्शल सर क्लॉड ऑखिनलेकची स्वाक्षरी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय सैन्यदले खर्या अर्थाने स्वतंत्र झाली होती. सार्वभौम बनली होती. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा ! भारताचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ! जय हिंद !
– श्री. संकेत कुलकर्णी, लंडन (साभार : फेसबुक)