US Congressman Raja Krishnamoorthi : हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेशातील अंतरिम सरकारशी संपर्क साधा ! – अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती

बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचारावर अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना लिहिले पत्र

अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचारावरून अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि उत्तरदायी व्यक्तींना न्याय देण्यासाठी अंतरिम सरकारशी संपर्क साधण्याची विनंती केली. या प्रकरणी त्यांनी पत्रही लिहिले आहे.

राजा कृष्णमूर्ती यांनी पत्रात म्हटले आहे की, बांगलादेशात आता महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंसाचार संपवण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिकेने तेथील सरकारशी संबंध निर्माण करावेत. खेदाची गोष्ट आहे की, बांगलादेशात सरकारच्या विरोधातील आंदोलनाने हिंदूविरोधी हिंसाचाराचे रूप धारण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०२१ मध्ये हिंदूविरोधी दंगलीत ९ जणांचा बळी गेला होता. शेकडो घरे, व्यवसाय आणि मंदिरे उद्ध्वस्त झाली होती. वर्ष २०१७ मध्ये १०७ हिंदू मारले गेले आणि ३७ लोक बेपत्ता झाले होते. बांगलादेशातील हिंसाचार आणि अस्थिरता स्पष्टपणे अमेरिका अन् त्याच्या मित्र राष्ट्रांच्या हिताचे नाही. मी तुम्हाला मुख्य सल्लागार युनूस सरकारशी थेट बोलण्याची विनंती करतो.