छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाने धमकी दिली आहे, असे चिठ्ठीवर लिहून मिलिंदनगर भागात एका आचार्याने गळफास घेतला. हा प्रकार ६ ऑगस्ट या दिवशी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. जगदीश सुरभय्ये असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जगदीश हे आचारी होते.
जगदीश सुरभय्ये यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘आमदार नारायण कुचे आणि त्यांचा भाऊ देविदास कुचे मला धमकी देत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे.’ याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी अन्वेषण चालू आहे, असे सांगितले. आमदार कुचे आणि त्यांचा भाऊ यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली.
याविषयी आमदार नारायण कुचे म्हणाले की, जगदीश सुरभय्ये यांच्या संपर्कात मी कधीही आलेलो नाही. या चिठ्ठीची सखोल चौकशी करावी, यासाठी मी आयुक्तांची भेट घेतली आहे.