उंदीर आणि अन्य जीवजंतू यांना ‘स्वाहा’ करून शेतीवाडीचे रक्षण करणार्‍या सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा नागपंचमीचा सण !

आज नागपंचमी आहे. त्या निमित्ताने…

नागपूजन

१. नागपंचमीचा सणाच्या निमित्ताने सापांप्रती प्रेम आणि ज्ञानदृष्टी जागृत होईल, अशी हितकारी अन् मंगलकारी व्यवस्था ऋषींनी केली असणे

‘एरव्ही बिळात रहाणारे साप पावसाच्या दिवसांत बिळात पाणी भरल्याने असाहाय्य आणि निराश्रित होतात. त्यामुळे अन्य दिवसांत साप दिसो कि न दिसो; परंतु पावसाळ्यात गावांत आणि शेताच्या आसपास ते दिसू लागतात. सापाला पाहून मनात द्वेष आणि भय निर्माण होऊ नये, यासाठी त्यांच्याप्रती प्रेम अन् ज्ञानदृष्टी जागृत होईल, अशी हितकारी अन् मंगलकारी व्यवस्था ऋषींनी केली आहे.

२. महादेवाने सापाला आपल्या शृंगारात ठेवले असणे

सापाला सुगंध पुष्कळ प्रिय आहे. साप चंदनाच्या झाडाला विळखा घालून रहातो. केवडा इत्यादी सुगंधी फुले येणारी झाडे त्याला पुष्कळ आवडतात. अशा सापाला महादेवाने आपल्या शृंगारात ठेवले आहे, म्हणजेच ज्याच्या जीवनात सद्गुणांच्या सुवासाचा आदर आणि प्रीती आहे, त्याला आपल्या जवळ ठेवले, तर आपल्या जीवनाचीही शोभा वाढेल.

३. सापाला कुणी त्रास दिला अथवा ‘त्याचे प्राण धोक्यात आहेत’, असे त्याला वाटते, तेव्हाच त्याने स्वप्राणाच्या रक्षणासाठी दंश करणे

महादेवाच्या गळ्यात आणि भुजांवर साप असतो. विषधराला गळा आणि भुजा यांवर धारण करणे, हा भारतीय संस्कृतीचे मूर्धन्य (आद्य) प्रचारक महादेवाचा बाह्य शृंगारही पावलोपावली प्रेरणा देतो. साप भलेही विषधर आहे; परंतु त्याचे गुणही पहा. हा उगीचच कुणाला दंश करत नाही. त्याला कुणी त्रास दिला अथवा ‘त्याचे प्राण धोक्यात आहेत’, असे त्याला जेव्हा वाटते, तेव्हा तो स्वतः सिद्ध केलेले विष प्राणाच्या रक्षणासाठी व्यय करतो. त्याचप्रमाणे मनुष्याला सेवा, स्मरण आणि तप करून जी ऊर्जा मिळाली आहे, ती त्याने अकारण व्यय करू नये. तिला प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवावे. क्रोधित होऊन आपल्या तपाचा नाश करू नये.

४. द्वेष आणि भीती यांपासून आपल्यासाठी नागपंचमीचा सण असणे

द्वेषाने द्वेष वाढतो; परंतु क्षमा आणि उदारता यांमुळे द्वेषाचा पालट प्रेमात होतो. द्वेषापेक्षा सापांप्रती प्रेम आणि सहानुभूती ठेवत, त्याची पूजा केल्याने त्याच्या चित्ताचा द्वेष शांत होतो. उंदीर आणि अन्य जीवजंतू यांना ‘स्वाहा’ करून शेतीवाडीचे रक्षण करण्यात साप सहयोगी सिद्ध होतो; म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही नागपंचमीचा उत्सव आहे. द्वेष आणि भीती यांपासून वाचण्यासाठीही नागपंचमीचा उत्सव पाहिजे.’ कशी आहे सनातन धर्माची सुंदर व्यवस्था !’

(साभार : मासिक ‘ऋषिप्रसाद’, जुलै २०२२)