मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी नजीकच्या काळात नवीन कायदा करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रस्त्यावरील अपघातांसाठी गुरांच्या मालकाला उत्तरदायी धरले जाईल !

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, ७ ऑगस्ट (वार्ता.) – मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये नवीन कायदा करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ७ ऑगस्टला विधानसभेत दिले. ते म्हणाले, ‘‘रस्त्यावरील अपघातांसाठी गुरांच्या मालकाला उत्तरदायी धरले जाईल. विविध खात्यांची एक समिती मोकाट गुरांचे प्रश्न हाताळेल. सरकार गोशाळा चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या संस्थांना भाडेतत्त्वावर भूमी देण्याचा विचार करत आहे.’’ ‘मोकाट गुरांमुळे अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या वाहनाच्या चालकांवर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात येतो. गुरांमुळे होणार्‍या अपघातासाठी गुरांच्या मालकाला उत्तरदायी धरणे आवश्यक आहे’, असे सूत्र गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी उपस्थित केले होते. याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ‘राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातही योग्य धोरण ठरवले जाईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘मोकाट गुरांमध्ये सरकारच्या कामधेनू योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या गायीही आढळतात. यापुढे अशा गायी मोकाट रस्त्यांवर फिरतांना दिसून आल्यास संबंधित मालकावर कारवाई होण्यासमवेत त्याला परत कधीच कामधेनू योजनेचा लाभ मिळणार नाही.’’