मुसळधार पाऊस असूनही धर्मप्रेमींचा आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे, ६ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी शिवतीर्थ, चौपाटी, भोर, पुणे येथे मूक आंदोलन घेण्यात आले. या वेळी भोर व्यापारी संघटनेचे श्री. अमोल शहा, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धारकरी श्री. राहुल शिंदे, श्री. साळुंखे, ‘राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी’चे प्राध्यापक श्री. काकासाहेब कोरे, सनातन संस्थेचे प्राध्यापक श्री. विठ्ठल जाधव, समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथेही आंदोलन घेण्यात आले.
४ ऑगस्ट या दिवशी सिंहगड रस्ता आणि तळेगाव दाभाडे, गाडीतळ हडपसर, कोथरूड, अलका टॉकीज चौक या ठिकाणीही असेच आंदोलन घेण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
मुसळधार पाऊस असूनही धर्मप्रेमींचा आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
४ ऑगस्ट या दिवशी सिंहगड रस्ता येथे झालेल्या आंदोलनात मुसळधार पाऊस असूनही सर्व धर्मप्रेमी आंदोलनाला उपस्थित राहिले. ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या गडदुर्ग संवर्धनाच्या संदर्भात कार्य करणार्या संघटनेचे श्री. प्रवीण डेरवणकर मूक निदर्शनांत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मारुति मंदिर चौक, तळेगाव दाभाडे, पुणे येथेही ४ ऑगस्ट या दिवशी मूक आंदोलन घेण्यात आले. अनेक धर्मप्रेमी स्वतःहून मूक आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक जिज्ञासेने हातातील फलक वाचत होते आणि समर्थन देत होते.
हडपसर येथे सियाराम मंदिर शाखेच्या माध्यमातून मूक आंदोलन !
हडपसर येथे सियाराम मंदिर शाखेच्या माध्यमातून मूक आंदोलन करण्यात आले. हडपसर वेशीजवळ, पुलाखाली झालेल्या आंदोलनाचे दायित्व सियाराम मंदिर शाखेतील सदस्य श्री. आकाश जाधव यांनी उत्स्फूर्तपणे घेतले. सर्वश्री विजय ढाकणे, अंकुश जाधव, अथर्व गायकवाड, वैभव घनचेकर, सचिन घुले यांनी निदर्शनापूर्वी २ घंटे एकत्र येऊन हातातील फलक सिद्ध करण्याची सेवा पुढाकार घेऊन केली. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विजय साळुंखे महाराजही या वेळी उपस्थित होते.
सासवड येथेही मूक निदर्शन !
सासवड (जिल्हा पुणे) – शिवतीर्थ चौक, सासवड येथे ५ ऑगस्ट या दिवशी विशाळगड अतिक्रमणाच्या विरोधात मूक निदर्शन करण्यात आले. या निदर्शनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
क्षणचित्र :
१. सोमवारच्या आठवडा बाजारात भाजी विकण्याचे रहित करून हिवरे गावातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
२. एक माजी सैनिक त्यांच्या लहान मुलाला घेऊन बाजारात जात होते. ते फलक वाचून शेवटपर्यंत निदर्शनात सहभागी झाले.