१५ ऑगस्टनंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढील कामास प्रारंभ !

पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदीर

कोल्हापूर – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे. हे काम १५ मार्चपासून चालू करण्यात आले आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक होऊन १५ ऑगस्टनंतर याचे पुढील टप्प्याचे काम चालू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘‘साधारणत: ९ कोटी रुपयांचे काम झाले आहे. यात प्रामुख्याने बाजीराव पडसाळी, मुख्य गाभारा, चारखांबी, सभामंडप यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाच्या संदर्भात समितीची लवकरच बैठक होईल आणि पुढील काम साधारणत: १५ ऑगस्टनंतर चालू केले जाईल.’’