पारंपरिक पोषाखाची अवहेलना !

बेंगळूरू (कर्नाटक) येथील ‘जी.टी. मॉल’मध्‍ये धोतर नेसून आलेल्‍या एका वयोवृद्धाला प्रवेश नाकारला

पोषाख आपल्‍या संस्‍कृतीचा अविभाज्‍य घटक ! सात्त्विक पोषाखामुळे आपली संस्‍कृती, परंपरा टिकण्‍यासह शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍यास साहाय्‍य होते. बेंगळूरू (कर्नाटक) येथील ‘जी.टी. मॉल’मध्‍ये धोतर नेसून आलेल्‍या एका वयोवृद्धाला प्रवेश नाकारला गेल्‍याचा व्‍हिडिओ नुकताच प्रसारित झाला. त्‍यांच्‍याकडे आधी काढलेली चित्रपटाची तिकिटे असूनही मुलगा आणि त्‍याचे वृद्ध वडील यांच्‍याशी प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचार्‍याने वाद घालून त्‍यांना आत जाण्‍यापासून रोखले. फकिरप्‍पा नाव असलेल्‍या या वृद्ध शेतकर्‍याला ‘शर्ट-पँट’ घालून या, मगच ‘मॉल’मध्‍ये प्रवेश दिला जाईल’, असे त्‍याने सांगितले. अनेक विनंत्‍या करून आणि ‘आपण असाच पोषाख परिधान करतो’, असे सांगूनही सुरक्षारक्षक अन् ‘मॉल’चे व्‍यवस्‍थापन त्‍यांच्‍या मतावर ठाम होते. भारतीय परंपरेचा अवमान आणि वृद्ध व्‍यक्‍ती यांचा अनादर झाल्‍याने या कृतीला नंतर समाजातून तीव्र विरोध झाला. दुसर्‍या दिवशी धोतर आणि पगडी परिधान करून आंदोलकांनी ‘मॉल’मध्‍ये प्रवेश करत व्‍यवस्‍थापनाविरुद्ध घोषणा दिल्‍या अन् कर्मचार्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी केली. त्‍यानंतर ‘मॉल’च्‍या व्‍यवस्‍थापनाने फकिरप्‍पांना ‘मॉल’मध्‍ये बोलावून त्‍यांचा सत्‍कार केला. मॉल व्‍यवस्‍थापन आणि सुरक्षारक्षक यांना फकिरप्‍पा यांची क्षमा मागायला लावली. विधानसभेत हा विषय चर्चेला आल्‍यावर राज्‍याचे नगरविकास आणि नगर नियोजन मंत्री बिराथी सुरेश यांनी शासनाच्‍या वतीने या घटनेचा निषेध करत ‘७ दिवस ‘मॉल’ बंद ठेवण्‍याचा आदेश काढला’, तसेच या ‘मॉल’ने २०२३-२४ च्‍या आर्थिक वर्षाचा १ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकित ठेवल्‍याने त्‍यावर वेगळी कारवाई करण्‍यात आली. थोडक्‍यात पोषाखाची अवहेलना ‘मॉल’ व्‍यवस्‍थापनाला चांगलीच महागात पडली आणि त्‍यांना चांगली अद्दलही घडली !

देशाचा पारंपरिक पोषाख परिधान करणार्‍या वडीलधार्‍या व्‍यक्‍तीला स्‍वत:च्‍याच देशात अशी वागणूक मिळणे, हे देशाच्‍या सांस्‍कृतिक अधोगतीचे द्योतक आहे. या प्रसंगाने शहरी भारतियांनी अंतर्मुख होण्‍याची आवश्‍यकता अधोरेखित होते. ते आपल्‍या संस्‍कृतीपासून एवढे दूर गेले आहेत की, त्‍यांना स्‍वत:च्‍याच देशात स्‍वत:चीच संस्‍कृती आणि वृद्ध यांवरील अन्‍यायाविरुद्ध सामाजिक माध्‍यमातून लढा उभा करावा लागला, तेव्‍हा कुठे संस्‍कृतीवरील आघाताला वाचा फुटली आणि न्‍याय मिळाला !

जेव्‍हा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी मंदिरात प्रवेश करण्‍याविषयीच्‍या वस्‍त्रसंहितेचा विषय काढला, तेव्‍हा त्‍याची कार्यवाही सोपी नव्‍हती. ऊर्जास्रोत असणार्‍या मंदिरांनाही विरोधाला सामोरे जावे लागले; मात्र हिंदू आणि संघटित मंदिर समित्‍या यांमुळे अनेक मंदिरांसाठीही वस्‍त्रसंहिता लागू झाली. भारतीय पारंपरिक पोषाखाचे सन्‍मानाने पुनरुज्‍जीवन होण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’च हवे !

– सौ. स्नेहा ताम्‍हनकर, रत्नागिरी