२० हून अधिक जण घायाळ !
सागर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील शाहपूर गावात ४ ऑगस्टच्या सकाळी धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी एक मोठा अपघात झाला. येथील हडौल मंदिर परिसरात भागवत कथेची सिद्धता केली जात होती. येथे शिवलिंग उभारले जात होते. अनेक तरुण यासाठी उत्साहाने तेथे जमले होते. अशातच मंदिराशेजारील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळली. तेथे असलेल्या मुलांवर ती पडल्याने त्यात ९ मुलांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण घायाळ आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही इमारत २५ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे साहाय्य !
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यावर म्हटले आहे की, या दुर्घटनेत घायाळ झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मृत मुलांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे.