राज्यभर ‘महिला हरिपाठ मंडळां’ची स्थापना करणार ! – मालुश्री पाटील, राज्य अध्यक्षा, वारकरी साहित्य परिषद

सांगली, ३१ जुलै (वार्ता.) – वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यभरात ‘संत मुक्ताई-जनाई महिला हरिपाठ मंडळे’ स्थापन करण्यात येत आहेत. कुटुंबाच्या सुधारणेत महिलांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या निमित्ताने प्रबोधनासह सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या राज्यअध्यक्षा मालुश्री पाटील आणि परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी दिली.

गेल्या काही मासांत राज्यातील ३६ जिल्ह्यांत मोठ्या संख्येने मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत मंडळे कार्यरत झाली आहेत. महिलांना हरिपाठ मंडळापुढे स्वतःच्या आरोग्यासह समाज सुधारणेचा संदेश दिला जाणार आहे. मंडळाच्या महिलांना गणवेश, टाळ देण्यात येणार आहे. कुटुंबांमध्ये संतांचे विचार रुजावेत, त्यातून सामाजिक स्वास्थ्य राखले जावे, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. गाव तेथे मंडळ, तसेच नगरपालिका क्षेत्रात प्रभाग तेथे मंडळ चालू करण्यात येणार आहे. मातृभाषेतूनच शिक्षणप्रसार हाही यामागील उद्देश आहे. सभासद महिलांना हरिपाठाच्या पुस्तिका देण्यात येणार आहेत. शिवाय त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, खेळ यांचेही नियोजन आहे.

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ !

या वेळी मालुश्री पाटील म्हणाल्या, ‘‘या निमित्ताने महिलांना शारीरिक व्यायाम आणि बौद्धिक चालना देण्याचा प्रयत्न आहे. घरातील मुला-मुलींवर चारित्र्याचे संस्कार, व्यसनमुक्ती हाही उद्देश आहे. पुरुषांना विरंगुळ्याची ठिकाणे असतात; पण महिलांना मर्यादा असते. हरिपाठ मंडळाच्या निमित्ताने त्यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळेल.’’