पुणे – नदीपात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, राडारोडा टाकून नदीपात्र अरुंद केले जात आहे. ‘मेट्रो’चे खांब, ‘नदीकाठ सुधार प्रकल्प’ यांमुळे नदी धोक्यात आली आहे. यापूर्वी ९० सहस्र ‘क्युसेक्स’ पाणी सोडल्यानंतरही एवढा मोठा पूर येत नव्हता; पण आता केवळ ३५ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्यावर अनेकांच्या घरात पाणी शिरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या माजी खासदार डॉ. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. ‘महापालिकेच्या प्रकल्पाविषयी उपस्थित केलेल्या सूत्रांचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा. तोपर्यंत नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम थांबवावे’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे शहराच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ‘पुणे बचाव मोहीम’ हाती घेतली आहे. नदीपात्रामध्ये जुन्या इमारती पाडल्यानंतर राडारोडा टाकला जात आहे, त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. या माध्यमातून पुणेकरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.