Paris Olympics Hijab Ban : पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये फ्रान्‍सच्‍या मुसलमान महिला खेळाडूंवरील हिजाबबंदी कायम !

(हिजाब म्‍हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्‍यासाठी वापरलेले वस्‍त्र)

पॅरिस (फ्रान्‍स) – येथे चालू असलेल्‍या ऑलिम्‍पिक स्‍पर्धेमध्‍ये मुसलमान महिला खेळाडूंकडून परिधान केलेल्‍या हिजाबवरून वाद निर्माण झाला आहे. फ्रान्‍सच्‍या हिजाबविरोधी कायद्यामुळे फ्रान्‍सच्‍या महिला खेळाडूंना हिजाब घालून खेळण्‍यापासून रोखले जात आहे. विशेष म्‍हणजे स्‍पर्धेत इतर देशांतील मुसलमान महिला हिजाब घालून खेळत आहेत.

१. वर्ष २०१७ मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय बास्‍केटबॉल फेडरेशनने हिजाब घालून खेळण्‍यावरील बंदी उठवली; परंतु फ्रेंच बास्‍केटबॉल फेडरेशनने हिजाबवरील बंदी उठवण्‍यास नकार दिला. फ्रान्‍समध्‍ये खेळाडूंना तसेच प्रशिक्षक आणि पंच यांना हिजाब घालण्‍यास मनाई आहे.

२. जून महिन्‍यात ‘ह्युमन राइट्‍स वॉच’ आणि ‘अ‍ॅम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल’ या कथित मानवाधिकार संघटनांनी आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्‍पिक समितीला पत्र लिहून फ्रान्‍सच्‍या हिजाब बंदीवर टीका करून या प्रकरणात हस्‍तक्षेप करण्‍याची मागणी केली होती. या संघटनांनी पत्रात लिहिले होते की, फ्रान्‍सच्‍या क्रीडा अधिकार्‍यांनी घातलेली हिजाबबंदी भेदभावपूर्ण आहे. ही बंदी हिजाब परिधान केलेल्‍या मुसलमान खेळाडूंना भेदभाव करत कोणताही खेळ खेळण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मानवी हक्‍कांपासून प्रतिबंधित करते.

३. फ्रेंच बास्‍केटबॉल फेडरेशनने याविषयी म्‍हटले आहे की, ते (हिजाबबंदी) फ्रान्‍सच्‍या धर्मनिरपेक्षतेचे धोरण प्रतिबिंबित करते. फ्रान्‍स सरकारचे हे धोरण सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कपडे घालण्‍यास प्रतिबंधित करते.

४. फ्रान्‍सची महिला बॉस्‍केटबॉल खेळाडून दैबा कोनाटे हिने सांगितले, ‘हिजाबवरील बंदी आम्‍हाला मिळणार्‍या संधी मर्यादित करत आहे. हिजाब सोडणे हा पर्याय नाही. मी हिजाब कधीही काढणार नाही; कारण तो माझ्‍या आयुष्‍याचा एक भाग बनला आहे.’

संपादकीय भूमिका

हिजाबबंदी करून आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विरोध झाल्‍यावरही त्‍या निर्णयावर ठाम रहाणार्‍या फ्रान्‍सकडून ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने शिकणे आवश्‍यक !