पंचगंगेतील अतिक्रमण, नदीतील गाळ न काढणे यांमुळे महापूर ! – उदय गायकवाड, पर्यावरणतज्ञ 

कोल्हापूर – आताचा पूर येण्याच्या अगोदर शहरातील कोणत्याही धरणातून विसर्ग चालू नव्हता. पंचगंगेचे पाणी पुढे वहात होते आणि पुढे असलेल्या हिप्परगी आणि आलमट्टी या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू होता. कोयना धरणातून विसर्ग चालू नव्हता. असे असतांना पंचगंगेच्या पाण्याने ४७ फूट ८ इंच पाणीपातळी गाठली आणि आता हे पाणी अल्प गतीने उतरत आहे. हे गंभीर आहे. पंचगंगा नदीत झालेले अतिक्रमण, नदीपात्रात असलेला गाळ उपसा न होणे या गोष्टी महापुराची तीव्रता वाढवत आहेत, असा आरोप पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

ते म्हणाले, ‘‘मी वर्ष १९८९, २००५, २०१९, २०२१ आणि २०२४ अशा सर्व पुरांचा अभ्यास केला आहे. दिवसेंदिवस पुराची तीव्रता वाढत आहे आणि गेल्या काही दिवसांत अल्प कालावधीत अधिक पाऊस पडत आहे. यंदाच्या पुराच्या पूर्वी गेल्या पावसाच्या दीडपट पाऊस अगदी अल्प कालावधीत पडला. पंचगंगा नदीचे क्षेत्र हे ३६८ किलोमीटर असून त्यात ६८ ठिकाणी बंधारे आहेत. या सर्व बंधार्‍यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. याचसमवेत पंचगंगा नदीत ८ मोठ्या ठिकाणी मोठे अडथळे निर्माण झाले आहेत जे मानवनिर्मित आहेत.’’ शहराच्या आसपास ४० पुलांची बांधकामे असून या पुलाच्या जवळपासही अनेक अवैध बांधकामे झाली आहेत. ही सर्व बांधकामे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण करतात.

पुणे-बेंगळुरू (कर्नाटक) हा राष्ट्रीय महामार्ग पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी वाहून न जाण्यासाठी एक मोठा अडथळा म्हणून कार्य करत आहे. आताच्या काळात जे अनेक नवीन पूल बांधले ते सर्व बांधतांना ‘इंडियन रोड काँग्रेस’ने महामार्ग बांधतांना घालून दिलेले नियम न पाळता बांधलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या वर्षी नद्यांमधील गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र तो गाळ काढला गेला नाही. पुढील काळात सर्व पुलांच्या परिसरात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी पूर आल्यावर ही चर्चा होते आणि नंतर यावर काहीच उपाययोजना होत नाही. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करणे अपेक्षित आहे.’’