कोल्हापूर – शहरात पंचगंगा नदीच्या पुराचे उपनगरांमध्ये घुसलेले पाणी हळूहळू न्यून होत आहे. यानंतर शहरात गाळ, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. २८ जुलैपासून महापालिका प्रशासनाने शहरातील ४० टन गाळ आणि प्लास्टिक कचरा उचलला आहे. हा कचरा मुख्यत्वेकरून दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रमणमळा, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, गवतमंडळ या, तसेच अन्य भागांतून काढण्यात आला.
या कचर्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या वस्तूच आहेत. कोल्हापूरकरांनी विविध माध्यमांतून कचरा म्हणून टाकून दिलेले प्लास्टिक परत पुराच्या माध्यमातून त्यांच्याच दारात परत आले आहे. यामुळे आतातरी नागरिक यातून बोध घेऊन प्लास्टिकचा वापर अल्प करणार का ? तसेच प्रशासकीय पातळीवर यावर कठोर उपाययोजना काढल्या जाणार का ? असा प्रश्न या निमित्ताने उपिस्थत होत आहे.