महापालिकेच्या कर्मचार्यांनी २० टन कचरा संकलित केला !
सांगली, २९ जुलै (वार्ता.) – येथील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत संथ गतीने घट होत आहे. २९ जुलै या दिवशी सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३८.११ फूट पाणी होते. सांगलीच्या पूर पट्ट्यातील पूर ओसरण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला आहे. तेथे औषध फवारणी करून परिसर स्वच्छ करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २९ जुलै या दिवशी येथे दिली.
सकाळपासून प्रभाग क्रमांक १४ आणि प्रभाग क्रमांक १२ मध्ये २०० कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये गुंतले होते. या २ दिवसांत महापालिकेने अनुमाने २० टन कचरा संकलित केला आहे. यासाठी २०० कर्मचारी १० घंटागाड्या आणि २ डोजर अशी यंत्रणा कार्यरत आहे. पूर परिस्थिती अल्प होत असतांनाच कोणतेही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये; म्हणून काळजी घेण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते. यानुसार उपआयुक्त वैभव साबळे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार पूरपट्ट्याच्या भागातील विष्णु घाट, अमरधाम स्मशानभूमी, धरण रोड आदी परिसरांत स्वच्छता चालू करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये पुराचे पाणी ओसरत जाईल, त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणीही केली जाणार आहे.