नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये विविध पक्षांचे नेते निवडून आले. निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते लोकांना आश्वासन देतात, ‘आम्हाला निवडून द्या. आम्ही अमुक करू, तमुक देऊ.’ मोठमोठी भाषणे करून जनतेला आमिषे दाखवतात. मते मिळण्यासाठी झोपडपट्टीत जाऊन लोकांचे पाय धरतात, त्यांना आदर देतात. लोक या खोट्या आमिषांना भुलून देशासाठी, गावासाठी धडपडणार्या त्यागी वृत्तीच्या लोकांना सोडून पैशांच्या हव्यासापोटी अयोग्य व्यक्तींना निवडून देतात आणि स्वतःसह देशाची हानी करतात. जनतेला हे कळत नाही की, त्यांनी आपल्याला पैसे दिले, ते मत देण्यासाठी; पण ‘हे पैसे एक-दोन दिवसांत संपतील; पण पुढे आपल्याला पुढच्या निवडणुका येईपर्यंत अनेक अयोग्य गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये आपल्या राष्ट्राची हानी आहे’, असा विचार ते करत नाहीत. या लोकांची संकुचित वृत्ती असल्यामुळे फक्त स्वतःपुरता आणि तात्पुरत्या काळापुरता ते विचार करतात.
आज महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार्यांना निवडून देणे आवश्यक आहे. खरेतर आज महिलांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय झाला आहे. सर्वत्र महिला असुरक्षित आहेत. ज्या देशात जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर अशा अनेक रणरागिणी होऊन गेल्या, त्याच देशात आज महिलांना असुरक्षित वाटते. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. अनेक मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. अनेक मंदिरांची तोडफोड होत आहे. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवरून दंगली घडत आहेत. आज दिवसा आणि रात्री एकट्या महिलेने प्रवास करायचा म्हटले, तर त्या जीव मुठीत घेऊन जातात, अशी भयानक स्थिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, त्या वेळी महिलांवर अत्याचार करणार्यांना तात्काळ कडक शिक्षा होत होती; जेणेकरून असे वाईट कृत्य करण्याचे कुणाचे धैर्य होणार नाही. त्यामुळे महिला सुरक्षित होत्या. तसे राज्य भारतात यायचे असेल, तर निवडून आलेल्या नेत्यांनी जनता कायमस्वरूपी आनंदी रहाण्यासाठी स्त्रिया आणि मंदिरे यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षेचा धाक सर्वांना असतो. जग शिक्षेवर चालते. जे महिलांच्या सुरक्षेविषयी काही ठोस कृती करण्यास सिद्ध असतील, त्यांनाच यापुढे निवडून द्या. शाळा-महाविद्यालयांमध्ये धर्मशिक्षण चालू केले, तर राजा आणि प्रजा दोघेही सुखी होतील. त्यामुळे आपापसांतील मतभेद, जात, पद, पक्ष विसरून कुटुंबाचे रक्षण करू शकणार्यांनाच सर्वांनी निवडून दिले पाहिजे.
– सुश्री (कु.) सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल.