प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘अफझलखानवधाचे शिल्प’ आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उभे करा !

  • सांगली येथील माजी आमदार नितीन शिंदे यांची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भेटीद्वारे मागणी !

  • आचारसंहिता लागण्यापूर्वी श्री शिवप्रतापाचे शिल्प बसवण्याचे वनमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश !

अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी करतांना श्री. नितीन शिंदे

सांगली, २७ जुलै (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करून ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून गेली २० वर्षे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी श्री. नितीन शिंदे यांनी यशस्वी लढा दिला आहे. अफझलखानाच्या थडग्याभोवती झालेल्या अतिक्रमणाची आणि संबंधित अपप्रचाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी शिंदे यांनी श्री शिवप्रतापाचे शिल्प प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करण्याची सातत्याने मागणी केली.

त्यानुसार शिल्पकार श्री. दीपक ढोपटे हे सध्या श्री शिवप्रतापाच्या शिल्पाला पूर्ण आकार देत आहेत. नितीन शिंदे यांनी या शिल्प निर्माण कार्याची कार्यशाळेत जाऊन पहाणी केली. शिंदे यांच्या मागणीनुसार वनमंत्री मुनगंटीवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी संबंधित सर्व विभागांतर्गत संपर्क साधून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच श्री शिवप्रतापाचे शिल्प प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येण्याविषयीचे आदेश ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सर्वांना दिले आहेत.