अतीवृष्टीमुळे दूध संकलनावर परिणाम, तर शेतीची हानी !
कोल्हापूर, २६ जुलै (वार्ता.) – संततधार पावसाने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे २६ जुलैला शहरातील कुंभार गल्ली, बापट कँप, तसेच अन्य भागांमध्ये पाणी शिरले. सातत्याने होत असलेल्या अतीवृष्टीमुळे ११ राज्यमार्ग आणि ३७ जिल्हामार्ग बंद आहेत. कोल्हापूर-राधानगरी, तसेच कोल्हापूर-गारगोटी हे मार्ग बंद असून शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २६ जुलैला सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली होती. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अनेक मार्ग बंद असल्याने याचा मोठा आर्थिक फटका ‘एस्.टी.’लाही बसला आहे.
अतीवृष्टीचा मोठा परिणाम दूध संकलनावर झाला आहे. गोकुळ आणि वारणा या दूध संघांमध्ये २ दिवसांत जवळपास ५० सहस्र लिटर दूध संकलन होऊ शकले नाही. बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली आहे. संततधार पावसाने पुराचे पाणी गेले ८ दिवस उतरले नाही, त्यामुळे गुरांना ओला चारा उपलब्ध झालेला नाही. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, दानवाह, अकीवाट या गावांतील नागरिकांनी रात्रीपासून स्थलांतरास प्रारंभ केला. अनेकांनी गत वेळचा अनुभव पहाता गायी-म्हशी यांचेही सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ८५.१२ टी.एम्.सी. पाणी असून धरणातून ३० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. सातारा जिल्ह्यात पाऊस काहीसा उघडल्याने धरणातून वाढवण्यात येणारा विसर्ग काही काळ स्थगित ठेवण्यात आला आहे. |