कोल्हापूर – शांतीदूत मर्दानी आखाड्याच्या वतीने आयोजित केलेली ‘पन्हाळा पावनखिंड’ मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही मोहीम पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्तीला अभिवादन करून सहस्रो शिवभक्तांच्या उपस्थितीत चालू करण्यात आली. या मोहिमेत आखाड्याच्या वतीने लाठीकाठी, तलवार, भाला यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या प्रसंगी देण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, अशा घोषणांनी परिसर शिवमय झाला.
या मोहिमेत नरवीर बाजीप्रभू यांचे ११ वे वंशज श्री. संदेश देशपांडे, ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, सर्वश्री दत्तात्रेय जाधव, विजय माने, कविराज नाईक, ‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’चे अध्यक्ष श्री. सूरज केसरकर, कार्याध्यक्ष श्री. अतुल केसरकर यांसह अनेक मुले, मुली सहभागी झाले होते.