पुणे येथे एकतानगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य चालू !
पुणे येथील एकतानगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचले आहे. येथे शेकडो लोक अडकले आहेत. त्यामुळे बोटीद्वारे बचावकार्य चालू करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. अनेक घरांत पाणी घुसल्याने अनेकांचे सामान पाण्यासोबत वाहून गेले आहे.
भिडे पूल, टिळक पूल पाण्याखाली !
२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.
मुळा-मुठावरील जुना पूल पाण्याखाली !
आदरवाडी गाव परिसरात डोंगराचा कडा ‘हार्ड रॉक’पासून तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मीटर आहे. १० ते १२ फूट उंचीचा मातीचा थर रस्त्यापर्यंत आला आहे. मांजरी खुर्द येथील मुळा मुठा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
मुळशीत पावसाचा हाहा:कार; ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद !
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजता ७० टक्के क्षमतेने भरले होते. २५ जुलैला दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ सहस्र ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. मुळशीतील ताम्हिणी घाट, मुळशी धरण परिसर, लवासा, मुठा खोरे, कोळवण खोरे, रिहे खोरे, भादस खोरे सर्वच भागांत पावसाचा रात्रभर जोर चालू आहे. आदरवाडी (ताम्हिणी) येथील ‘पिकनिक पॉईंट हॉटेल’वर दरड कोसळली असून त्यामध्ये २ व्यक्ती दबले होते. त्यांना पोलीस आणि लोकांनी बाहेर काढून पुणे येथे हॉस्पिटलमध्ये पाठवले असून त्यामधील शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील सर्व शाळा आणि कार्यालये २५ जुलैला होती बंद !
हवामान विभागाने येत्या काही घंट्यांत पुणे शहर आणि घाट क्षेत्रांत मुसळधार पावसाची चेतावणी दिली असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांतील भाग, खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा आणि कार्यालये यांना २५ जुलैला बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले होते.
लोणावळ्यातही ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस !
लोणावळ्यातही ‘रेकॉर्ड ब्रेक’ (उच्चांक मोडणारा) पाऊस कोसळला आहे. २४ घंट्यांत ३७० मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे ‘पर्यटनस्थळी पर्यटकांनी येऊ नये’, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकार्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकार्यांना रस्त्यावर (फिल्डवर) उतरण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एन्.डी.आर्.एफ्. (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) आणि सैन्याचे कर्नल यांच्याशी संवाद साधून नागरिकांना साहाय्य करण्याचे त्यांना आवाहन केले आहे, तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचे साहाय्य घेतले जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी. नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा ! पुणे – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ जुलैला सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरभाषवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, तसेच बचाव आणि साहाय्यकार्याच्या सिद्धतेचा आढावा घेतला. खडकवासला, तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन, तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ साहाय्य पोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, तसेच मदत आणि बचाव पथकांना सज्ज रहाण्याचे जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत. |
या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध !
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी ६ वाजल्यापासून २० सहस्र ५७४ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, तसेच धरण परिसरात १०० मि.मी. आणि घाटमाथ्यावर २०० मि.मी.हून अधिक सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. हा विसर्ग अधिक प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यात भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळादेवी मंदिर डेक्कन, संगम पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील घडामोडी !
१. पुणे महानगरपालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर-मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई आणि चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पूल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
२. पुणे महानगरपालिका हद्दीत एकतानगर, सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शारदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, पिंपरी चिंचवड येथील घरकुल सोसायटी, आकुर्डी येथील वृंदावन आश्रम, विणस सोसायटी, कुंदननगर या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. साहाय्य आणि बचाव कार्य चालू आहे.
३. निंबजनगर परिसरातील सोसायटी आणि सिंहगड रोड वरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली आहेत त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
४. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले असून अनेक भाग जलमय झाले आहेत. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
५. भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेड मधून भिमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे.
६. वडघर, तालुका वेल्हा येथे डोंगरातील माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक चालू केली आहे.
७. पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक साहाय्य कार्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
८. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाणी देण्याच्या जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्या आहेत.
९. मुसळधार पावसामुळे २६ जुलैला निगडी येथे होणारी ‘फळे आणि भाजीपाला निर्यात परिषद’ पुढे ढकलण्यात आली आहे.
१०. पर्यटनस्थळी २४ तासांकरता बंदी आदेश जारी करण्यात आहे.