Bangladesh Objects Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बांगलादेशाविषयीचे विधान संभ्रम निर्माण करणारे !

बांगलादेशाने बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुनावले !

बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी

ढाका (बांगलादेश) – बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्‍याविषयी आमच्‍या मनात आदर आहे. त्‍यांच्‍याशी आमचे जवळचे नाते आहे; मात्र त्‍यांनी बांगलादेशाविषयी  जे विधान केले आहे, ते संभ्रम निर्माण करणारे आहे. त्‍यामुळे आम्‍ही यासंदर्भात भारत सरकारला पत्र लिहिले आहे, अशी माहिती बांगलादेशाचे परराष्‍ट्रमंत्री हसन महमूद यांनी दिली आहे. बांगलादेशामधील आरक्षणावरून झालेल्‍या हिंसक घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘तेथील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे असून त्‍यांनी साहाय्‍य मागितल्‍यास त्‍यांना आश्रय देऊ’, असे विधान बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेत बोलतांना केले होते. त्‍यावर बांगलादेशाकडून वरील प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाली आहे.

बांगलादेशाने आक्षेप नोंदवल्‍यानंतर बंगालचे राज्‍यपाल सी.व्‍ही. आनंद बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्‍या विधानाविषयी राज्‍य सरकारकडे अहवाल मागितला आहे. ‘परदेशातून येणार्‍या लोकांना आश्रय देण्‍याची भाषा करणे, हे अत्‍यंत गंभीर असून घटनात्‍मक उल्लंघन दर्शवते’, असे राजभवनाने प्रसारित केलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.