पुणे – महापालिकेतील कामाचे कंत्राट मिळवण्याच्या वादातून एका ठेकेदारावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याची घटना गंज पेठेत घडली. या प्रकरणी ठेकेदार निर्मल मोतीलाल हरिहर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार मलनि:स्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश गिते यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात २१ जुलैला रात्री गुन्हा नोंद केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठेकेदार निर्मल हरिहर २१ जुलैला दुपारी गंज पेठेतील घराजवळ थांबले होते. तेव्हा गणेश गिते आणि त्यांचा भाऊ महेश यांनी त्या ठिकाणी येऊन हरिहर यांना ११ कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट घेऊ नये, यासाठी पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. याविषयी माहिती मिळताच ‘परिमंडळ १’चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, साहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संपादकीय भूमिकाअसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि धमकी देणारे अभियंता महापालिकेत कार्यरत असणे, हे महापालिकेला लज्जास्पद आहे. संबंधित अभियंत्याने पूर्वी केलेल्या कामांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. |