रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव  भावपूर्ण वातावरणात साजरा

रत्नागिरी, चिपळूण, दापोली, लांजा आणि खेड येथील महोत्सवाचा सहस्राहून अधिक  जिज्ञासूंनी घेतला लाभ

 

रत्नागिरी – गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या महोत्सवाचा जिज्ञासूंना लाभ व्हावा, यासाठी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिर सभागृह, चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील श्री स्वामी मंगल कार्यालय, रत्नागिरी शहरातील टी.आर्.पी. जवळील अंबर सभागृह, लांजा येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय आणि दापोली येथील ए.जी. हायस्कूलच्या श्री. माधव कोकणे सभागृह याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले. या महोत्सवात गुरुपूजन, आरती, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन, मान्यवर वक्त्यांचे विचार आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.  

१. रत्नागिरी

प्रभाकर खानविलकर

हिंदु समाजाने संघटित होणे ही काळाची आवश्यकता ! – प्रभाकर खानविलकर, हिंदुत्वनिष्ठ

साधनेचे आपल्या जीवनात पुष्कळ महत्त्व आहे. साधना केल्यानंतर भविष्यातील सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. आपल्या अडचणी दूर होतात. आपला हिंदु समाज आज विखुरलेला आहे. हिंदु समाजाने संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे. समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण नावे घेतो; पण खरंच तसे वागतो का ? आपण त्यांचे अनुकरण करतो का ? याचे प्रत्येक हिंदूंनी आत्मचिंतन करायला हवे. आज हिंदूंसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत; पण संघटनेला ध्येय आणि निष्ठा आवश्यक असते. जिल्ह्यात हिंदु संघटना मजबूत नसल्याने आपल्याला विविध धर्मविरोधी आघातांना सामोरे जावे लागत आहे; म्हणून आपले संघटन आवश्यक ठरते.

येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनीही मार्गदर्शन केले. या महोत्सवाला ४०० जिज्ञासू आणि साधक उपस्थित होते.
विशेष : रत्नागिरी येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके चालू असतांना अचानक वीज खंडित होऊन अंधार झाला. त्या वेळी जिज्ञासूंकडून उत्स्फूर्तपणे भ्रमणभाषची विजेर्‍या (टॉर्च) चालू करण्यात आली. त्या प्रकाशात प्रात्यक्षिकेही चालू राहिली.

चिपळूण

चंद्रकांत वामन कदम

धर्मांतरण होऊ नये यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया! – चंद्रकांत वामन कदम, श्री भवानी वाघजाई मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष टेरव, तालुका चिपळूण

गावागावांतील मंदिरे, तसेच वाडीवाडींतील मंदिरे मंदिर महासंघाला जोडली जावी जेणेकरून सनातनच्या माध्यमातून साधना केली जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्र निर्मितीला बळ मिळेल. हिंदूसंघटनामुळे इस्लामच्या आक्रमणाचा प्रतिकार करणे शक्य होईल. आपण सर्वांनी धर्मविरोधी घटनांना पायबंद बसेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. हिंदु राष्ट्राची निर्मिती झाली नाही, तर आम्हाला कोणत्याही देशात आश्रय मिळणार नाही. आपल्याला धर्मांतरण करणे भाग पडेल. यासाठी आपण मतभेद विसरून एकत्र येऊया आणि संघटितपणे प्रयत्न करूया.


या वेळी समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी मार्गदर्शन केले. येथील गुरुपौर्णिमेला २७५ जिज्ञासू आणि साधक उपस्थित होते.

दापोली

रवींद्र यशवंत मेहेंदळे

आपल्याला गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे ! – रवींद्र यशवंत मेहेंदळे, संचालक, हर्णे विद्यामंदिर

जे महाभारतात नाही ते जगात नाही, हे जग व्यासांचे उच्छिष्ट आहे; म्हणजेच या जगात जे आहे ते सगळं महाभारतात होतच. महाभारतामधून आपण काहीच शिकलो नाही यासाठीच गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

अन्य धर्मीय करत असलेला शस्त्रास्त्रांचा छुपा पुरवठा; आसाम, त्रिपुरा, बंगाल या क्षेत्रांमध्ये मुसलमानबहुल होत असलेले जिल्हे याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे, याविषयी श्री. मेहेंदळे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार !

कु. तनुश्री महेंद्र बंडे (८१ टक्के), कु. प्रांजली गजानन बेर्डे (८०.४०) आणि
काजल विलास बडवे (६८.२०) सेवेत असणार्‍या युवतींचा सनातन संस्थेचे साधक श्री केशव अष्टेकर यांनी सत्कार केला.
येथे हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवाला १७५ जण उपस्थित होते.

लांजा

येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात काही साधकांनी स्वतः केलेले प्रयत्न सांगून साधनेमुळे स्वतःत काय पालट झाले, तसेच साधनेमुळे आनंदी जीवनाचा अनुभव कसा घेत आहोत ? ते सांगितले. या वेळी काही धर्मप्रेमींचा मान्यवर वक्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता सिनकर यांनी केले. या महोत्सवाला १२५ जण उपस्थित होते.

विशेष : दिवसभर संततधार पाऊस पडत असतांनाही राजापूर तालुक्यातील भू, पेंडखळे, पाचल, तसेच लांजा तालुक्यातूनही जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 खेड

येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचा सन्मान सौ. रूपाली भालेकर यांनी केला. ह.भ.प. बाळकृष्ण बाईत महाराज यांचा सन्मान श्री. शिवाजी सालेकर यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मप्रेमी श्री. किशोर पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. दहावीची विद्यार्थिनी कु. जान्हवी विजयकुमार भुवड (७९ टक्के) हिचा सत्कार दापोली येथील सनातनचे साधक श्री. दिनेश कडव यांनी केला. ‘सनातन प्रभात’चे वितरक साधक श्री. बाबासाहेब मच्छिंद्र तुंबारे आणि श्री. विश्वास हरिश्चंद्र यादव, भरणे यांचा सत्कार श्री. परेश गुजराथी यांनी केला.